विक्रमबाबांसह शेतकऱ्यांच्यावर दाखल केलेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्या अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल ; शेतकऱ्यांचा इशारा ; कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांचा ठिय्या

 

पाटण, दि. 1 (शंकर मोहिते) : मल्हारेपठ येथे कृषी विभागाने घेतलेला कार्यक्रम हा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा असून कृषी विभागाचा त्यामध्ये काडीमात्र संबंध नाही. त्यामुळे विक्रमबाबा पाटणकर यांच्यासह इतर चार जणांवर पोलिसांनी दाखल केलेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत. अन्यथा समस्त शेतकऱ्यांना घेवून तीव्र जनआंदोलन छेडावे लागेल, असा इशारा विक्रमबाबा समर्थकांसह शेतकऱ्यांनी शनिवारी तहसील कार्यालयासमोर आंदोलनावेळी दिला.
दरम्यान, यावेळी शेतकऱ्यांच्यावतीने पाटणचे तहसीलदार रामहरी भोसले यांना निवेदन देण्यात आले. मल्हरापेठ येथील कार्यक्रमात विक्रमबाबा पाटणकर यांनी कृषी अधिकाऱ्याच्या श्रीमुखात लगावली होती. घडलेली ही घटना शेतकऱ्यांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती. पाटण तालुक्यात अतिपावसाने पिके कुजत असताना त्याचा पंचनामा करायचा सोडून अधिकारी खाजगी कंपन्यांचे एजंट झाल्याचा तो परिणाम होता. संबंधित अधिकाऱ्याने सदर कंपनीच्या जाहिरातबाजीसाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यामुळे तो शासकीय नव्हे तर प्रायव्हेट लि. कंपनीचाच कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाची कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे झालेली घटना शासकीय कार्यक्रमात नसल्याने विक्रमबाबा पाटणकर यांच्यासह इतरांवर दाखल केलेले गुन्हे चुकीचे असून ते मागे घेण्यात यावेत अशा भावना यावेळी कार्यकर्त्यांसह उपस्थित शेतकऱ्यांनी बोलून दाखविल्या.
आंदोलनावेळी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शंकरराव गोडसे, यशवंतराव जगताप, चंद्रकांत मोरे, लक्ष्मण चव्हाण, शंकरराव मोहिते, सदाशिव जाधव, दादा कदम, शिवाजीराव कोळेकर, बाळासाहेब देसाई, पाटण तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष विकास हादवे, यांच्यासह विक्रमबाबा समर्थक आणि शेतकरी मोठ्यासंख्येने सहभागी झाले होते. यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

सकाळी ११वा. तहसील कार्यालयासमोर झालेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर दुपारी दिड वा. सुमारास सातारा जिल्हा कृषी विभागातील सर्व कृषी अधिकारी, कर्मचारी यांनी आरोपींना अटक होण्यासाठी काळ्या फिती लावून काम बंद ठिय्या आंदोलन केले.