Friday, April 19, 2024
Homeठळक घडामोडीखाल्ल्या मिठाला जागणारा गवळीवाढा.....;  आठवणीतील किस्से.. दादांच्या शब्दातुन...

खाल्ल्या मिठाला जागणारा गवळीवाढा…..;  आठवणीतील किस्से.. दादांच्या शब्दातुन…

 पाटण:- ( शंकर मोहिते ) एका कार्यक्रमाच्या निमंत्रणासाठी दादांच्या कडे जाण्याचा योग आला. तसे आम्ही पाटण तालुका पत्रकार संघाचे काही  १०-१२ पत्रकार  सदस्य दांदाना भेटण्यास  वाडयात गेलो. पाच – दहा मिनिटांच्या प्रतिक्षेत दादा हि पत्रकांराना भेटण्यास आले. पत्रकारांनी दादांना कार्यक्रमाचे निमंत्रण दिले आणि दादांनी हि ते स्विकारले. यावेळी काही इतर  अनौपचारिक  चर्चेला सुरुवात   झाली.  आणि विषय थोडासा निवडणूकांच्या चर्चेवर आला. निवडणुकीच्या अनुभवावर विस्मरणात ठेवलेल्या काही उदाहरणा पैकी एक उदाहरण पत्रकारांना सांगण्यास दादांनी सुरुवात केली. आणि जुनी माणसं शब्दांची कशी पक्की असतात ते दादांनी पत्रकांराना सांगितल..

विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजले होते. प्रचार सभांचा  ढामढूल सुरू होता. गाव, वस्ती,  वाडीवर गाठी- भेटी  सुरू होत्या.  दोनशे- अडीचशे मतदानाचा असणा-या गवळीवाढ्यातील काही मंडळी भेटण्यास वाढ्यावर आली. आणि म्हणालीत दादा आम्ही तुमचच हाय.. इथून पुढं तुमचंच राहणार काय भी काळजी करायची नाय.‌ आमच्या वस्तीवर तुम्ही समद दिलय आता काय भी नग. आता फकस्त एकच शब्द द्या. निवडणून आला की पहिल आमच्या वस्तीवर यायचं. आणि आमच्या वस्तीच्या शाळेवरचा बदली झालेल्या गुरूजीची बदली थांबवून त्यालाच परत शाळेव दाडायचा. बस फकस्त ऐवढच करा. असा शब्द घेऊन हि मंडळी निघून गेली.
निवडणूक पंधरा दिवसांवर येऊन ठेपलेली. विरोधकांचे वाडीवस्तीवर जोरदार प्रयत्न सुरू होते. या गवळी वाढ्यावर विरोधकांचे कार्यकर्ते दररोज दिवसा, रात्री कधीपण हेलपाटे मारत होते. पण काही निभाव लागणा म्हणल्यावर या कार्यर्कत्यांनी वेगळ्या मार्गाचा अवलंब करून एक जिवंत बकर.. तांदळाचं ठिक्क आणि जोडीला एक-दोन खोकी अस साहित्य गवळी वाढ्यावर दाडल. तरीपण निभाव लागला नाही. दिवस भर राणा-वणातन, शेतातून दमून आलेल्या या वस्तीवरील मंडळींना लवकर झोपायची सवय. सगळी वस्ती झोपली की विरोधकांच्या कार्यकर्त्यांचा जथा दररोज मताच्या निमित्तान वस्तीवर बकर, तांदळाचं ठिक्क आणि खोकी बरोबर घेऊन हायच. व्यो दररोजचा जथ्याला समदा गवळीवाडा वैतागलेला. या वैतागातून सुटका कसा सोडवायचा म्हणून गवळी वाढ्यान एक दिवस  कार्यकर्त्यांकडून  बकर ठेवून घ्यायच ठरवलं. जस वस्तीन बकर ताब्यात घेतल तस आपल काम फत्ते झाल अस समजत विरोधी कार्यकर्त्यांचा आनंद व्दिगूणित झाला. गवळीवाडा फुटला म्हणून बातमी आमच्या कानावर आली. मनाला वाईट हि वाटल गवळी वाड्याची  ऐवढी काम करून देखील विश्वासातला गवळीवाडा फुटला..      या गवळीवाड्यावर जाऊन एकदा लोकांची समजूत काढू असं वाटल. परत विचार केला तीन – चार तास या गवळीवाड्यावर वाया घालवण्यापेक्षा तळातली चार गावात लोकांना भेटू असं म्हणत गवळीवाड्यावर जायचं टाळल.


निवडणुकीचे मतदान झाल. मतमोजणीचा दिवस आला. मतमोजणीवेळी वळीन मतपेट्या बाहेर काढून मत मोजली जात होती. गवळीवाड्याची मतपेटी पुकारले नंतर माझं लक्ष त्या मतपेटीकड गेलं. पेटीतल मतदान मोजल गेल. अवघी दोनच मत विरोधकांच्या पारड्यात पडली. आश्र्चर्याचा सुखद धक्का बसला.  ती पण चुकून गेली. सगळा निकाल जाहीर झाला. विजय आपलाच झाला. मिरवणुकीच्या रणधुमाळीतन मोकळ झाल्यानंतर गवळीवाड्याचा शब्द आठवला. दुसऱ्या दिवशी सकाळी गवळीवाड्यावर जायचं ठरवलं तसा निरोप हि पुढं वस्तीवर पाठवला. दुसऱ्या दिवशी सकाळी १० वा. सुमारास गवळीवाड्यावर पोहोचलो सगळीकडे आनंदीआनंद वातावरण होतं. मिरवणूकीची जय्यत तयारी करून ठेवलेली. सगळी मंडळी नटून थटून गवळी –  वाड्याच्या वेशीवर येवून थांबलेली. आम्ही पोहचताच एकीकडे फटाक्यांचा आवाज तर दुसरीकडे लेझीम ढोल ताशांचा डावांन गवळी वाढ्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. पोरी – बाळी, बायका – माणसासकट आख्खा गवळी वाढा मिरवणुकीत सामील झाला होता. मिरवणूक गवळी वाढ्यात पोहचली. सत्कार – समारंभ भाषण – भिषण सगळी झाली. झण-झणीत मटन रस्याच्या धुरणावर सगळ्यांनी ताव मारला. आणि सगळी निवांत झालो.


दुपारच्या वेळेला झाडाच्या सावलीत निवांत बसलो असताना गवळी वाढ्याची समधी म्होरकी पुढारी माझ्या बाजूने बसली. बोलता – बोलता मिच बोलायला सुरुवात केली. आणि म्हणलं तुमच काम पक्क केलं आहे. तुमचा गुरूजी उद्यापसन शाळेत येईल. हे सांगताना माझ्या मनात घोळत असलेला प्रश्र्न मी गवळी वाढ्याच्या समदया  पुढा-यांना केलाच. अर विरोधकांच्या कडून गवळी वाढ्यात बकर – बाटल्यांच खोकी आली हुतीत त्याच काय केल?  समदी मत मलाच दिलीत. सगळी मंडळी एका – मेकाकड टका – मका बघु लागली. माझी उत्सुकता काय सांगत्यात ती ऐकायची. त्यातन एकजन  बोलू लागला.. दादा तुम्हासणी गवळी वाढ्यान शब्द दिला होता. फकस्त तुम्हालाच मत द्यायचीत आणि तुम्ही आमचा बदली झालेला गुरूजी परत द्यायचा. तसा गवळी वाढा शाब्दाला पक्का हाय. मी म्हणलं..अर पण त्या बक-याच आणि खोक्यातल्या बाटल्यांच काय केलत. ? तो सांगू लागला.. लय वैताग दिला विरोधकांच्या माणसांनी आमासणी बदलायचा.. दररोज उट – सुट हि माणस गवळी वाढ्यात.. आम्ही अस  ऐकायचो नाय म्हणून त्यांनी मतदानाच्या चार दिस आधी एक दहा –  बारा किलोच बकर बाटल्यांची दोन खोकी आणि तांदळाचं ठिक्क  हे कार्यकर्त घेऊन वस्तीवर आलीत. आणि अम्हा समद्यानशी बोलवून हे तुमच्या ताब्यात घ्या असा अट्टाहास धरला. जी धु़धींतली होतीत त्यांच डोळ खोक्याकड टका – मका, टका – मका लागल होतत. या कार्यकर्त्यांच्या कचाट्यातन सुटण्यासाठी एकदाच बकर आणि खोक ठेवून घेतलं. काम फत्ते झाल या खुशीत कार्यकर्त भी निघून गेलत. दुसऱ्या दिवशी आमच्या वस्तीची बैठक झाली. बक-या बरोबर खोक्याच आणि तांदळाचं करायच काय? शेवटी निर्णय झाला. मतदाना दिवशी मतदान झाल्यावर रातच्याला बकर कापून तांदूळ शिजवायच आणि वस्तीतल्या पोरा- बाळासकट समद्यानी बक-याच्या रस्यावर ताव मारायचा. ठरल्याप्रमाण मतदान झालं. आणि रातच्याला बक-याचा बेत भी झाला. मी मदीच त्याच बोलन रोखत विचारल.. आर जेवण – बकर – खोक विरोधकाचं आणि मत मला कशी. ? तोवर तो बोलला.. सरकार.. हिच तर मैक हाय.. म्हणून तर विरोधकाचं बकर मतदान झाल्यावर कापल.. आणि समदया वस्तीन खाल्लं. मतदानाच्या आधी चार दिवस आलेल बकर मतदाना आधीच खाल्लं असत तर तुमच्या खाल्या मिठाशी गद्दारी झाली असती “खाल्या मिठाला जागाव..” म्हणून मतदान झाल्यावर बकर खाल्लं…

शंकर मोहिते.
पत्रकार पाटण.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular