वाई नगरपालिकेच्या निवडणूकीत 75 टक्के विक्रमी मतदान

वाई : संपूर्ण राज्यासह  सातारा जिल्ह्यात नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणूकींची जोरदार रणधुमाळी चालू असून सर्वप्रमुख पक्षांनी निवडणूक प्रतिष्ठेची बनविली आहे. राज्य शासनाने या निवडणूकीमध्ये नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडण्याची प्रक्रिया ठेवल्याने नगराध्यक्ष पदासाठी इच्छूकांची संख्या वाढल्याने चुरस वाढली होती. जिल्ह्यात आठ नगरपालिका व सहा नगरपंचायतींची निवडणूक असून वाई नगरपालिकेच्या दहा प्रभागातून वीस नगरसेवक पदांसाठी 51 उमेदवार रिंगणात आहेत तर नगराध्यक्ष पदासाठी पाच उमेदवार रिंगणात आहेत.
वाई नगरपालिकेसाठी राष्ट्रवादी पुरस्कृत तीर्थक्षेत्र आघाडी, भाजप, कॉग्रेस व आरपीआय पुरस्कृत वाई विकास महाआघाडी, शिवसेना व अपक्ष यांच्यात लढत आहे. शहराची एकूण मतदार संख्या 29137 असून यामध्ये महिला 14679 व पुरूष 14458 येवढे मतदार आहे. रविवारी सकाळी 7.30 वाजता 39 मतदान केंद्रावर मोठ्या उत्साहात मतदानाला सुरूवात झाली. प्रत्येक मतदान केंद्रावर सकाळच्या सत्रात मतदारांची गर्दी दिसून आली. प्रत्येक पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकत्यांची बुथवर मोठी गर्दी दिसून येत होती. सकाळी आकरापर्यंत 23 टक्के मतदार दुपारी 2 वाजेपर्यंत 44 टक्के मतदान झाले तर संध्याकाळी 5.30 पर्यंत 75 टक्के येवढे मतदान झाले.
जेष्ठांना कार्यकर्ते वहानाच्या मदतीने मतदान केंद्रावर जाण्याची परवानगी देण्यात आल्याने ताण-तणावाचे वातावरण झाले नाही. तालुक्याचे आ. मकरंद पाटील व माजी आ. मदन भोसले यांनी वाई शहरातील सर्व मतदान केंद्रांना भेट देवून आढावा घेतला. सकाळी थंडी असतानाही मतदारांनी उत्स्फुर्तपणे मतदान केले. काही संवेदनशिल मतदान केंद्रावर यामध्ये प्रभाग क्रंमाक आठ व नऊ येथे चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दिवसभरात शहरात कोठेही अनुचित प्रकार घडला नाही.
चोख बंदोबस्त : वाई नगरपालिकेच्या मतदान प्रक्रियेसाठी संपुर्ण वाई शहरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता यामध्ये एक डी.वाय.एस.पी., एक पी.आय, तीन ए.पी.आय., चार पी.एस.आय., 90 पोलिस, तीस होमगार्ड तर चार फोरेस्ट ऑफीससर तैनात करण्यात आले होते.