मुकुल माधवतर्फे नऊ व्हीलचेअर्सचे सातार्‍यात वाटप

सातारा : फ़िनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फ़ाऊंडेशन यांच्या सहयोगाने सातारा आणि सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यामध्ये मोफ़त फ़िजिओथेरपी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याचाच पाठपुरावा म्हणून शिबिरामध्ये आढळून आलेल्या लाभार्थ्यांना विशेष पद्धतीने बनविण्यात आलेल्या व खास आयात केलेल्या 9 व्हीलचेअर्स व 1 पोर्टेबल कमोडचे वाटप करण्यात आले. साता-यातील डे केअर सेंटर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आणि या कार्यक्रमाला सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी, सौ. पुनिता गुरव या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. तसेच यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी खंडेराव धरणे, फिनोल्क्सचे प्रतिनिधी संतोष शेलार, मुकुल माधवचे अतुल माने, फिजीओथेरपीस्ट डॉ. राहित बर्गे, मंगल खांडेकर, सौ. अश्‍विनी रानडे उपस्थित होते.
जागतिक सेरेब्रल पाल्सी दिनाचे औचित्य साधून 7, 14 आणि 15 ऑक्टोबर 2016 रोजी फ़िजिओथेरपी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पुण्यातील संचेती हॉस्पिटलमधील फ़िजिओथेरपीस्ट आणि अस्थिरोगतज्ञांचा संघ या शिबिरामध्ये सहभागी झाला होता ज्यांनी शिबिरादरम्यान सल्ला आणि फ़िजिओथेरपी मोफ़त उपलब्ध करून दिली. एकूण 112 मुलांनी या शिबिराचा लाभ घेतला. साता-यातील सेरेब्रल पाल्सीग्रस्त मुलांसाठी काम करण्याच्या त्यांच्या प्रकल्पाच्या माध्यमातून 169 व्हीलचेअर्स आणि 103 कमोड्सचे घरी देण्यात आले तर 100 सीपी चेअर्सचे शाळेला देण्यात आल्या. आताचे हे दानकार्य त्यांच्या याच प्रकल्पाचा एक भाग आहे. याही पलिकडे जाऊन 15 मुलांवर संचेती हॉस्पिटल्मध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली आणि 10 मुलांना अतिरिक्त उपकरणे पुरविण्यात आली.
या प्रकल्पाची सुरूवात  जेव्हा  नोव्हेंबर 2015 मध्ये करण्यात आली, त्यावेळी सातारा जिल्हा परिषदेने सेरेब्रल पाल्सीग्रस्त 314 मुलांची यादी समोर आणली आणि त्याचक्षणी फ़िनोलेक्स इंडस्ट्रीज आणि त्यांचे सीएस आर पार्टनर असलेल्या मुकुल माधव फ़ाऊंडेशनने त्वरित या प्रकल्पामध्ये उतरण्याचे निश्चित केले. 3 तपासणी शिबिरे, 2 फ़िजिओथरपीची शिबिरे आणि वाईतील मिरजकर हॉस्पिटल येथे पुनर्वसन केंद्राची उभारणी केल्यानंतर आत्तापर्यंत 502 मुले ही सेरेब्रल पाल्सीने ग्रस्त असल्याचे निदर्शनास आले आहे. साता-यासारख्या छोट्या जिल्ह्यामध्ये ही आकडेवारी पाहणं ही खरोखरच धक्कादायक बाब आहे आणि आता या परिस्थितीबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी उपाययोजना करण्याची तरतूद शासनाला करणे गरजेचे आहे.
यापुढे जाऊन मुकुल माधव फ़ाऊंडेशनने पुढाकार घेऊन सेरेब्रल पाल्सीबाबत आकाशवाणीच्या माध्यमातून दर बुधवारी सकाळी 10.15 वाजता  हौंसला आगे बढने का या कार्यक्रमाच्या माध्यमातून जागरूकता निर्माण करीत आहे. या कार्यक्रमाद्वारे पालकांनी त्यांच्या मुलांची कशी काळजी घ्यावी, तज्ञांचे मार्गदर्शन, अभिप्राय आणि त्यांचे अनुभव या गोष्टी सांगण्यात येतात. तसेच या कार्यक्रमातून सर्वसाधारण जनतेला, शेजा-यांना आणि कार्यकर्त्यांना या प्रकल्पामध्ये सहभागी व्ह्यायचे असल्यास त्याबाबत आवाहनही करण्यात येते.
या क्षणी बोलताना फ़िनोलेक्स इंडस्ट्रीजच्या संचालिका आणि मुकुल माधव फ़ाऊंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त, सौ. रितू छाब्रिया म्हणाल्या की, या मुलांसाठी बरेच काही केलेल आहे आणि अजूनही खूप काही करता येण्यासारख आहे. याचेच पुढचे पाऊल म्हणून या मुलांना अपंगत्त्व प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. जेणेकरून शासनाच्या विविध योजनांचा या मुलांना लाभ घेता येईल. आम्ही आकाशवाणीचे आभारी आहोत, जे एका सुरेख कार्यक्रमाच्या माध्यमातून आमच्या लाभार्थ्यांच्या घरापर्यंत पोहोचले. आम्हांला अशी आशा आहे की अजूनही अनेक लोक ही सेवा घेऊ शकतील आणि फ़िनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फ़ाऊंडेशन साता-यातील लोकांना सेवा देण्यास कार्यरत आहेतच. विशेष उल्लेख करावासा वाटतो ते मॅप्रो ़फूडसचे श्री. मयूर व्होरा ज्यांनी 14 आणि 15 ऑक्टोबर 2016 रोजी वाई येथे घेण्यात आलेल्या फ़िजिओथेरपी शिबिरादरम्यान सहभागी मुलांच्या, पालकांच्या आणि कार्यकर्त्यांच्या दुपारच्या जेवणाचा खर्च उचलला. त्याचप्रमाणे प्रकल्पादरम्यान मदत करणा-या मोबाईल शिक्षक, केंद्र समन्वयक आणि अधिका-यांचेही मनापासून आभार! फ़िनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फ़ाऊंडेशन, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि मासर(गुजरात) येथील ग्रामीण भागातील आरोग्य, शिक्षण, सामाजिक कल्याण, पाणी आणि स्वच्छता अशा विविध क्षेत्रातील प्रकल्पामध्ये गेल्या दशकापासून अतिशय चांगल्या पद्धतीने कार्यरत आहे.