औंधच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष ; वास्तूकलेतील फिरते खांब

सातारा : (केशव चव्हाण) सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील औंध येथे राज्याच्या कानाकोपर्‍यातून श्री यमाई देवीचे भक्त येत असतात. औंध येथील  मुळपीठ डोंगरावर श्री यमाई देवीच्या मंदिराभोवती काळ्या पाषाणातील तटबंदी आहे. या तटबंदीच्या मध्यभागी फिरते दगडी खांब आहेत. कित्येक शतके झाली तरी हे खांब आजही जसेच्या तसे आपले अस्तित्व टिकवून आहेत. महाराष्ट्रात अशा प्रकारे आढळणारे वास्तूकलेतील हे एकमेव दुर्मिळ खांब असून हे खांब वास्तूकलेस आव्हान बनून राहिले आहे. हे खांब दिवसेंदिवस भाविकांसह पर्यटकांच्या कुतुहलाचा, जिज्ञासेचा व आकर्षणाचा केंद्रबिंदू बनले आहेत. 
औंध येथील मुळपीठ डोंगरावर श्री यमाई देवीच्या मंदिराभोवती सुमारे साडेसातशे ते आठशे वर्षापूर्वी तटबंदी बांधलेली आहे, असे मानले जाते. तटबंदी संपूर्णपणे काळ्या पाषाणात बांधलेली आहे. ही तटबंदी म्हणजे उत्कृष्ट वास्तू कलेचा नमूना आहे. त्याकाळी  प्रतिकूल परिस्थिती असताना वाहनांची सोय नसताना मोठाले दगड डोंगरावर नेवून ही तटबंदी उभारली आहे. या तटबंदीच्या मध्यभागीच हे दगडी खांब आहेत. श्री यमाई देवीच्या मंदिरापासून दहा ते पंधरा फुट अंतरावर नंदीच्या मागील बाजूस दगडी जोत्यामध्ये हे काळ्या पाषाणातील खांब बसविलेले आहेत.
हे दगडी खांब बसविताना अत्यंत खूबीने बसविले आहेत. दगडी खांबाची उंची अडीच ते तीन फुट आहे. हे खांब फिरण्यासाठी दगडी सोंगट्या तयार केल्या आहेत. खांबाची जाडी पंधरा इंचाच्या आसपास आहे. हे खांब वर-वर बघितले तर बघणारांच्या मनात त्या विषयी प्रचंड उत्सुकता निर्माण होत असल्याचे आढळून आले आहे. हे खांब इतके सफाईदारपणे बसविण्यात आले आहेत की, आजच्या वास्तूविशारदांना हे एक आव्हानच आहे. श्री यमाई देवीच्या दर्शनासाठी, संग्रहालय पाहण्यासाठी येणारे भाविक-पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला आहे.
श्री यमाई देवी मंदिराच्या आवारातील फिरत्या खांबांची बांधणी तेराव्या-चौदाव्या शतकात केली आहे, असे मानले जाते. परंतू तसा कोणताही उल्लेख या ठिकाणी नाही. मात्र, गेल्या कित्येक शतकापासून असलेल्या या खांबांची कोणत्याही प्रकारची झिज झाली नाही. हेच या खांबांचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. तसेच हे खांब लहान मुलही फिरवू शकते. राज्याच्या व परराज्याच्या विविध भागातून येणारे भाविक श्री यमाई देवीचे दर्शन घेतल्यानंतर श्रध्देने हे खांब फिरवितात तर पर्यटक कुतुहल म्हणून खांब फिरवतात. ऊन, वारा, पाऊसामुळे या खांबाची कोणत्याही प्रकारची झिज झालेली नाही.
खांब जागचेसुध्दा हलले नाहीत की वातावरणाचा कोणताही परिणाम यावरती झाला नाही. इतके हे काम मजबूत आहे. या खांब व तटबंदीचे काम निश्‍चित कोण व कितव्या शतकात केले हे जरी नमूद नसले तरी औंधच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारे हे फिरते खांब जणू भाविक व पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज असल्याची साक्ष देत असून अशा दुर्मिळ कलाकृती जतन करून ठेवणे गरजेचे आहे. कारण अशा कलाकृती पुन्हा होणे नाही. एवढे मात्र खरे.