सोनेरी रंगाने भहरला “सुंदरगड”* पिवळ्या, जांभळ्या, पांढऱ्या निसर्ग फुलांचे साम्राज्य

पाटण:- ( शंकर मोहिते ) – केवळ कास पठारच नव्हे तर सह्याद्रीच्या कणखर पठारावर निसर्गाच्या नवलाईमुळे कोयना खो-यातील पाटण परिसरातील सुंदरगडावर (घेरादात्तेगड) आणि सडा वाघापूर डोंगर पठारावर पिवळ्या, जांभळ्या, पांढ-या निसर्ग फुलांचे साम्राज्य पसरले असून सोनेरी रंगाने सुंदरगड न्हाऊन निघाला आहे. सध्या या निसर्ग फुलांचा स्वर्ग जणू सह्याद्रीवर अवतरला आहे.

पाटणच्या अगदी जवळ वायव्येस सुमारे ३ मैलाच्या अंतरावर सह्याद्रीच्या अथांग पठारावर निसर्ग सौंदर्याच्या सानिध्याय सुंदरगड उर्फ घेरादातेगड हा किल्ला आहे. सद्या हा किल्ला निसर्गातील पाना-फुलांनी भहरलेला आहे. जुलै ते सप्टेंबर या काळात हा किल्ला मिकी-माऊससारख्या पिवळ्या धम्मक फुलांनी सजला जातो. ही फुले स्मिथिया कुळातील वनस्पती असून लहाण मुलांना आवडणाऱ्या कार्टुन मधील मिकी- माऊस सारखी दिसतात. या फुलांकडे पाहताक्षणी सोनेरी रंगाचा सुंदरगड असल्याचा भास होतो. अनेक सुंदर कीटक, पक्षी या फुलांभोवती विहरत असतात.
किल्ल्यावर गेल्यावर या स्वर्गीय फुलांचे दर्शन घडते. वनविभागाच्या वतीने या परिसरात विविध प्रकारच्या झाडांची लागवडही करण्यात आले आहे. या फुलांच्या आगमनाने उपेक्षित सुंदर गडाचे निसर्गसौंदर्य खुलून गेले असून या गडावरील अवतरलेल्या फुलांमुळे आता पाटणच्या पर्यटन क्षेत्राला गती मिळू लागली आहे.
याच परिसरातील सडा वाघापूरच्या कातळ पठारावर पांढ-या, निळ्या फुलांचा विशाल गालिचा पसरलेला आढळतो. निळ्या, काळ्या, पिवळ्या रंगाचा विलोभनीय साक्षात्कार सडा वाघापूरला पाहता येतो. या पठारावर ५ ते १० से.मी. देठावर असंख्य छोटय़ा छोटय़ा फुलांचा मिळून गुच्छ तयार झालेला दिसतो. त्यामुळे थोडय़ाशा पाणथळ जागेत इवले इवले चेंडू वाऱ्यावर डोलताना दिसतात.
या लाखो संख्येच्या पांढ-या चेंडूंना गेंद असे म्हणतात. ही मूळ वनस्पती ऐरिओकोलोन या कुळातील आहे. ग्रेमिनिफोलिया या निळ्या फुलांच्या अनेक जाती येथे आढळतात. पाटण-कोयना खो-यातील या परिसरात सध्या वनस्पती अभ्यासक व पर्यटकांना निसर्ग फुलांचा अनोखा रंगोत्सव अनुभवायला मिळेत आहे.