जि.प. सदस्यांच्या पतीच्या उचापतीने सातार्‍यातील अनेक अधिकारी त्रस्त

सातारा: शिक्षणमाता सावित्रीमाई फुले यांची जयंती देशभर साजरी झाली. स्त्रियांचा सन्मान करण्यात आला. पण सातारा जिल्हा परिषदेच्या महिला सदस्यांना अधिकार मिळूनही त्यांना त्याचा वापर करता येत नाही. राजकीय नेत्याच्या वरदहस्तामुळे नेते सांगतील, तेच ऐकण्याची मानसिकता झाली आहे. त्यातच जि. प. सदस्यांनी महिला सदस्यांच्या पतीच्या उचापतीमुळे व त्यांच्या फोनवरील अवाजवी मागण्यांमुळे अधिकारी त्रस्त झालेले आहेत. अधिकार्‍यांच्या अधिकारांवर गदा आणणार्‍या अशा उचापती पतींवर कारवाई करावी, अशी मागणी रिपाई ब्लू फोर्सच्यावतीने दादासाहेब ओव्हाळ यांनी जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्याकडे केली आहे.
सातारा जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादीची सत्ता आहे. तसेच काँग्रेस, भाजप या पक्षाचेही सदस्य आहेत. सध्या महिला आरक्षणामुळे प्रत्येक तालुक्यात महिलांना संधी मिळत आहे. काही अपवाद वगळता सदस्य झालेल्या महिला या आपल्या पतीच्या परवानगीने सभागृहात येतात. पण नाष्टा केल्यानंतर त्यांना आपल्या पतीलाही नाष्टा देण्याची व्यवस्था करावी लागते. तसेच विकासकामांबाबत निधी खर्च करताना पती ज्या ठेकेदारांची शिफारस करतील, त्याच ठेकेदाराला काम देणे किंवा सहभागी करुन घेणे अशी कामे करावी लागतात. त्यामुळे जावली व सातारा तालुक्यात जि. प. सदस्यांच्या पतीच्या ज्ञानाने कमिशनचे रांजण भरु लागले आहेत. तर दुसर्‍या बाजुला पत्नीच्या जिवावर माय का लाल झालेला पती सध्या भागिदारीमध्ये निविदा घेण्यासाठी अधिकार्‍यांवर दबाव आणत असल्याची चर्चा सध्या होत आहे. याबाबत काही अधिकारी दबावतंत्राचा वापर होत असल्याचे मान्य करीत आहेत तसेच नियमानुसार आम्ही काम करतो, असे सांगताना काही बेकायदेशीर गोष्टी घडत असल्याचे नाकारत नाहीत. सन्माननीय सदस्यांच्या पतीने शासकीय कार्यालयात हस्तक्षेप करु नये आणि हस्तक्षेप केला तर त्यांच्यावर कारवाई करावी, असे परिपत्रक राज्यशासनाने काढलेले आहे. पण त्याचा वापर सातारा जिल्ह्यात होत नाही. त्यामुळे पतीच्या उचापतीने त्रस्त झालेला अधिकारीवर्ग अधिकार असूनही मौन बाळगत आहेत. तेरी भी चुप और मेरी भी चुप- माल खायेंगे दोनो गुपचुप अशी सातारा जिल्हा परिषदेत अवस्था झाली आहे. राजकीय नेत्यांचा वापर करुन काही महाभाग हे जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या अगोदरच जिल्हा परिषदेमध्ये जाळे टाकून बसलेले असतात. जावलीतील जि. प. उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे हे मनमिळावू स्वभावाचे असल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी त्यांच्या भेटीसाठी येतात. ही संधी साधून सातारा-जावलीतील काही उचापतीकार कामे सुचवून गुळांबा मिळतोय का? याची नोंद सीसीटीव्ही कॅमेर्‍यात झाली आहे. आठ दिवसांत शासनाच्या परिपत्रकाचा वापर न केल्यास फ्लेक्स लावून परिपत्रक जिल्हा परिषदेच्या समोर लावण्यात येईल, असा इशारा रिपब्लिकन ब्लू फोर्सच्यावतीने देण्यात आला आहे. या निवेदनावर जिल्हाध्यक्ष मदन खंकाळ, पक्ष प्रमुख बाबा ओव्हाळ, रवी बाबर, किरण बगाडे, रवी शेडगे यांच्या सह्या आहेत.