जि. प. अध्यक्षपदी सुभाष नरळे बिनविरोध

 

सातारा : संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी मार्डी गटाचे सदस्य व विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांचे खंदे समर्थक सुभाष नरळे यांची आज बिनविरोध निवड झाल्याचे अध्यासी अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ आश्‍विन मुद्गल यांनी सोमवारी दु. 2 वा. जाहीर केले आहे.

जि.प. अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जि.प. अध्यक्षपदासाठी आज सातारा जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली. दुपारी 12 ते 1 पर्यंत इच्छुक उमेदवारांचे नाम निर्देशन पत्र करण्यात आले. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून मार्डी जि.प. गटातून सुभाष नरळे यांचा एक अर्ज तर त्यांच्या विरोधात राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे महादेव पोकळे यांनी दोन अर्ज दाखल केले होते. दुपारी 1 नंतर आलेल्या उमेदवाराची अर्जाची छाननी अध्यासी अधिकारी तथा जिल्हाधिकारी आश्‍विन मुद्गल यांनी केली.

दोन जणांचे तीन अर्ज वैध असल्याचे जाहिर करण्यात आले. यानंतर दुपारी 2 वा. राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य महादेव पोकळे यांनी आपला अध्यक्ष पदासाठी दाखल केलेले दोन्ही अर्ज नाट्यमय घडामोडीनंतर मागे घेतले. प्रत्यक्षात अध्यक्षपदासाठी एकमेव सुभाष नरळे यांचा उमेदवारी अर्ज शिल्लक राहिल्याने नरळे यांच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.

दरम्यान या निवडीनंतर नवनिर्वाचित जि.प. अध्यक्ष सुभाष नरळे यांचे अध्यासी अधिकारी तथा जिल्हाधिकारी आश्‍विन मुद्गल, सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी भरत वाघमारे, पक्षप्रतोद बाळासाहेब भिलारे, जि.प. उपाध्यक्ष रवि साळुंखे, जि.प. सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर, जि.प. सदस्य अनिल देसाई, अर्थ व शिक्षण समिती सभापती सतीश चव्हाण, मावळते अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, जि.प. सदस्य  दिपक पवार, कृषी सभापती शिवाजीराव शिंदे, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख, तसेच महिला व बाल कल्याण सभापती, समाज कल्याण सभापती, तसेच अधिकारी यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष सुभाष नरळे यांच्या समर्थकांनी जि.प.च्या समोर भर पावसात फटाके वाजवून व गुलालाची उधळण करून आनंद व्यक्त केला. या निवडीप्रसंगी सातारा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.आर. पाटील व त्यांच्या सहकार्‍यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

 

रामराजेंचा व्हीप

अध्यक्षपदासाठी चार जण शर्यतीत असताना सकाळी 10 वा. अध्यक्षांच्या बंगल्यावर विधान सभेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांनी स्वत:च्या सहीने पक्षादेश (व्हीप) काढला व  जि. प. अध्यक्षपदासाठी मार्डी गटाचे सुभाष नरळे यांचे नाव जाहीर केले. रामराजेंच्या या आदेशाची तंतोतंत अंमलबजावणी झाली.

माणचा अध्यक्ष

40 वर्षानंतर

स्व. आ. सदाशिवराव पोळ यांच्यानंतर माण तालुक्यास गेल्या 40 वर्षानंतर सातारा जि.प.मध्ये अध्यक्षपदाचा मान मिळाला आहे. माण तालुक्यात पक्षाची ताकद वाढावी म्हणून या तालुक्यास संधी दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती.