पाचगणी : भारताच्या चांद्रयान – ३ मोहिमेने जगभरात भारताची मान उंचावली असून प्रत्येक भारतीयाचा उर अभिमानाने भरून आला आहे.भारतीय शास्त्रज्ञांच्या या अतुलनीय कामगिरीची किमया जावली तालुक्यातील सनपाने गावच्या युवकाने आपल्या घरच्या गणपती उत्सवात साकारली आहे.घरच्या गणपतीच्या सजावटीसाठी त्याने तयार केलेला प्रत्यक्ष चांद्रयान मोहिमेच्या प्रतिकृतीचा हलता देखावा सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.या वैज्ञानिक देखाव्याने त्याची सर्वत्र त्याची वाहवा होत आहे.
गणपती उत्सवात अनेक ठिकाणी अनेक सामाजिक विषयावर देखावे, प्रतिकृती साकारून, यातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात येतो. मात्र सनपाने येथील अक्षय दुधाने या युवकाने देशाच्या चांद्रयान मोहिमेने प्रभावित होत चांद्रयान – ३ च्या गगनभरारीची प्रतिकृती साकारली आहे.यातून भारतीय ग्रामीण युवक सुद्धा आज तंत्रज्ञानात पुढे येऊ पाहत असून त्यास फक्त प्रोत्साहनाची गरज असल्याचे यावरून दिसत आहे. जावळीच्या दुर्गम भागात शैक्षणिक प्रगती किती उंचावली आहे. हे यावरून सिद्ध होत आहे.अक्षय दुधाने याचा घरचा पारंपरिक व्यवसाय सुताराचा असून त्याने बनवलेली चांद्रयान ही प्रतिकृती निश्चितच प्रेरणादायी आहे.
: १) हा चांद्रयान देखावा प्रत्यक्षात साकारण्याकरिता १२ रुपये खर्च आला असून याची उंची ८ फूट आहे. याचे वजन १५ किलो आहे. त्याला आकाशी झेप घेण्याकरिता गिअर बॉक्सचे व्हील व मोटार बसविल्याने त्याची परिक्रमा दाखविता येते.
२) फिरते कमळ हे प्रथमतः बनविले ते यशस्वी झाल्याने हुरूप वाढला त्यानंतर मग पंख हलविनारा गरुड, मोर, पॅरिस झुलता मनोरा, इत्यादी हलते देखावे तर स्थिर देखावे यामध्ये गेट वे ऑफ इंडिया, ताजमहाल, कृष्ण रथ, हंश, रायगड मेघ डांबरी, हे आत्तापर्यंत साकारले आहेत.
३) अक्षयच्या वडिलांना या कलाकुसर करण्यात रुची आहे. लहापणापासूनच बरोबर कामाला जात असल्याने त्याला सुद्धा आवड निर्माण झाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे अक्षय तयार झाला आहे. त्याचे शिक्षण सायन्स मधून एम एस सी पर्यंत झाले आहे.
: चांद्रयान मोहिमेच प्रक्षेपण पाहून संकल्पना मनी रुजली होती. त्यामुळे त्याची प्रतिकृती तयार करून आपण त्याचे साक्षीदार बनण्याचा प्रयत्न केला आहे. या कामी वडिलांचे मार्गदर्शन लाभले, त्यामुळेच ही संकल्पना प्रत्यक्षात आणणे शक्य झाले आहे. तर संकल्पनेमुळे खेड्या पाड्यातील युवकांना नक्कीच प्रेरणा मिळेल..
अक्षय दुधाने, सनपाने, तालुका जावळी.