सातारा ः पश्चिम महाराष्ट्राचे आकर्षण असणार्या बांधकाम विषयक रचना 2017 या प्रदर्शनाच्या भव्य मंडप व स्टॉल उभारणीचा शुभारंभ बिल्डर्स असोसिएशन सातारा शाखेचे अध्यक्ष मंगेश जाधव, असोसिएशनचे ज्येष्ठ सदस्य श्रीराम कुलकर्णी, नथमलशेठ जैन, रामदास जगताप व अन्य मान्यवरांच्या यांच्या शुभहस्ते व असोसिएशनच्या पदाधिकारी सदस्यांच्या उपस्थितीत भूमीपूजन करून व श्रीफळ फोडून जिल्हा परिषद मैदान येथे झाला.
यावेळी बोलताना मंगेश जाधव म्हणाले की पुण्या -मुंबईच्या तोडीस तोड रचना हे प्रदर्शन बिल्डर्स असोसिएशन आयोजित करते. यंदाच्या वर्षीच्या रचना प्रदर्शनातून बदलते सातारा , विकसीत होणारे सातारा ही सातारची ओळख संपुर्ण राज्याला या प्रदर्शनाद्वारे करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. रिअल इस्टेट मध्ये गुंतवणूक करू इच्छीणार्या दिग्गजांपासून ते आपले घर हे स्वप्न बाळगणार्या सामान्य माणसासाठी हे प्रदर्शन म्हणजे पर्वणीच ठरणार आहे. गृहप्रकल्पांचे एकाच ठिकाणी विविध पर्याय बघण्याची सुवर्णसंधी यानिमित्ताने उपलब्ध होत आहे. सातार्यात मध्यमर्गीयांना आवाक्यात असणार्या किंमतीत सदनिका उपलब्ध आहेत. बांधकाम तंत्रातील नवनवीन तंत्रज्ञान, अत्याधुनिक पध्दती यामुळे नागरिकांना त्यांच्या राहत्या शहरात विविध पर्याय उपलब्ध होणार आहेत. मागील नऊ रचना प्रदर्शनांचा अनुभव व वाढता प्रतिसाद पाहून जिल्हा परिषदेच्या भव्य मैदानावर या प्रदर्शनाचे आयोजन केले गेले असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रदर्शनात अनेक रिअल इस्टेट व्यावसायिक आणि बांधकाम व्यवसायाशी निगडीत असणार्या सातारा व अन्य जिल्ह्यातील कंपन्या सहभागी होणार आहेत. ग्राहकांना खात्रीची व विश्वासार्ह सेवा मिळावी हाच बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सातारा शाखेचा मुख्य हेतू आहे. पश्चिम महराष्ट्राचे आकर्षण असणार्या रचना 2017 या बांधकाम विषयक भव्य प्रदर्शनास सातारा जिल्ह्यातील सर्वांनी आवश्य भेट द्यावी असे आवाहन बिल्डर्स असोसिएशन तर्फे करण्यात आले आहे.
या प्रदर्शनात बांधकाम प्रकल्पांबरोबरच गृहसजावट, कन्स्ट्रक्शन मशिनरी, फर्निचर, सिक्युरिटी सिस्टीम्स्, सोलर सिस्टिम, गॅस गिझर, किचन अॅक्सेसरीज यासारखे विविध आकर्षक स्टॉल बघायला मिळतील. प्रदर्शनात एकूण 97 स्टॉल्स आहेत. खवैय्यांसाठी फूड मॉलची व्यवस्था प्रदर्शनस्थळी केली आहे. या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजकत्व लक्ष्मी स्टील अँड टिंबर्स यांनी व सहप्रायोजकत्व एएसी ब्लॉक्स कोल्हापूर व कुपर कार्पोरेशन यांनी स्वीकारले आहे. हे प्रदर्शन जिल्हा परिषद मैदान येथे दिनांक 26 ते 29 जानेवारी 2017 दरम्यान सकाळी 10 ते रात्री 9 या वेळेत सर्व नागरिकांना विनामूल्य खुले राहील.