सातारा: 10जुलै.. ईडीने जप्त केलेल्या जरंडेश्वर साखर कारखान्याला केलेल्या कर्ज पुरवठ्याची माहिती तातडीने सादर करा, अशी नोटीस ईडीने सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेला बजावली आहे. ईडीच्या या नोटिसीमुळे राज्याच्या सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
ईडीने नुकताच जरंडेश्वर साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई केली आहे. कारखान्यांशी सबंधित असणार्या कंपन्यांची चौकशी सुरू आहे. ज्यांनी जरंडेश्वर कारखाना लिलावात घेतला त्यांना चार बँकांनी कर्ज पुरवठा केला होता. त्यात सातारा जिल्हा बँकेनेही 96 कोटींचे कर्ज दिल्याचे समोर आले आहे. हा कर्जपुरवठा नेमका कसा केला, याची माहिती ईडीने मागवली आहे. देशभरात नावाजलेल्या जिल्हा बँकेला ईडीची नोटीस आल्याने राज्याच्या सहकार वर्तुळात खळबळ उडाली आहे.
जरंडेश्वर साखर कारखाना हा पूर्वी सहकारी कारखाना होता. मात्र, महाराष्ट्र सहकारी बँकेचे कर्ज फेडू न शकल्याने त्या कारखान्याचा लिलाव झाला. नंतर तो कारखाना खासगीत विकला. हा साखर कारखाना किरकोळ किंमतीत विकला गेला. याबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. त्यानुसार मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याच्या अनुषंगाने 26 ऑगस्टला ‘ईडी’ने याप्रकरणी ‘पीएमएलएल’ कायद्यानुसार गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली.
अफवांवर विश्वास नको: सरकाळे
अंमलबजावणी संचलनालय म्हणजेच ईडीनं जरंडेश्वरला दिलेल्या कर्ज प्रकरणी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला नोटीस बजावण्यात आली आहे. ईडीची नोटीस मिळाल्यानंतर सातार्यात उलटसुलट चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अधिकार्यांनी या नोटिशीसंदर्भात खुलासा केला आहे. ईडीच्या नोटीस संदर्भात कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन जिल्हा बँकेचे मुख्याधिकारी राजेंद्र सरकाळे यांनी दिली आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकाही बँकेनं काय साांगितलं?
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ईडीची नोटीस आली असून कोरेगाव येथील जरंडेश्वर शुगर्स या कारखान्यासाठी नेमके किती कर्ज वितरित करण्यात आले याबाबतचा खुलासा ईडीच्या नोटीस मध्ये मागवण्यात आला आहे. याबाबत जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्याधिकारी राजेंद्र सरकाळे यांनी या नोटीस बाबत खुलासा केला आहे.
बँकेनं जरंडेश्वरला किती कर्ज दिलं?
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं 2017 पासून 237 कोटी रुपये कर्जाची मंजुरी दिल असून जरंडेश्वर कारखान्यासाठी 128 कोटीचे कर्ज वितरीत केले आहे. कारखान्याकडे सध्या 97 कोटी 37 लाख कर्ज शिल्लक आहे जरंडेश्वर शुगर कडून वेळेत कर्ज फेडले जात आहे का? नेमके किती कर्ज वितरीत करण्यात आले आहे याविषयीची माहिती ईडी कार्यालयाकडून मागवण्यात आली आहे, अशी माहिती राजेंद्र सरकाळे यांनी दिली.
राजेंद्र सरकाळे यांनी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सुस्थितीत असून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केलं आहे.
सध्या जिल्हा बँक राष्ट्रवादीच्या ताब्यात असून पुणे जिल्हा बँकेसह जरंडेश्वरला चार बँकांनी कर्ज दिल्याची माहिती समोर आली आहे. आता या कर्ज प्रकरणात सातारा जिल्हा बँकेचाही सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ईडीच्या अनेक प्रश्नांची उत्तरं सातारा जिल्हा बँकेला द्यावी लागणार आहेत.