सातारा : बाँबे रेस्टॉरंट चौकातील सर्व्हिस रोडवर कंटेरनने दिलेल्या धडकेत रस्त्याकडेला थांबलेल्या वृध्दाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता उपस्थित असणार्या नागरिकांच्या अंगाचा थरकाप उडाला होता. तरी या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात कंटेनर चालकावर गुन्हा दाखल झाला आहे. कंटेनर चालक अपघात झाल्यानंतर घटनास्थळावरून पलायन केले आहे. या अपघातात विलास पंढरीनाथ दांडेकर वय 55 रा. रिलायबल पार्क गोडोली हे ठार झाले.
पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, आज सकाळी 10.30 च्या सुमारास विलास दांडेकर हे दुचाकीवरून बाँम्बे रेस्टॉरंट चौकात कोल्हापूरकडे जाणार्या सर्व्हिस रोडवर कामानिमित्त आले होते. त्यावेळी ते दुचाकी लावून त्याठिकाणी थांबले होते. दरम्यान कोरेगावहून आलेला कंटेनर बाँम्बे चौकातील आयलंडला वळसा घालून सर्व्हिस रोडवरून कोल्हापूरकडे जात असताना दांडेकर यांना जोरात धडक बसली. या धडकेत दांडेकर कंटेनरच्या मागच्या चाकात येवून सुमारे 30 फुट फरपटत पुढे गेले. त्यात ते गंभीर जखमी होऊन जागीच मयत झाले. या अपघातानंतर कंटेनर चालक घटनास्थळावरून पळून गेला. याची माहिती पोलीसांना समजल्यानंतर पोलीसांनी तात्काळ घटना स्थळावर पोहोचले. पोलीसांनी संबंधित ठिकाणचा पंचनामा केला व दांडेकरांचा मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात पाठवून दिला. या घटनेची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात झाली आहे. याची फिर्याद मच्छिंद्र लक्ष्मण मुळीक रा. रिलायबल पार्क गोडोली यांनी दिली आहे.