माझे राजकीय जीवन उध्वस्त करणारांना उघडे पाडेन : एकनाथ खडसे

I will expose those who destroyed my political career Eknath Khadase

मुंबई : माझ्यावर आरोप झाल्याच्या पहिल्या दिवसापासून मी विरोधकांना पुरावे सादर करण्याचे आव्हान दिले होते. मात्र, आजपर्यंत एकही पुरावा सादर करण्यात आलेला नाही. याउलट केवळ प्रसारमाध्यमांमध्ये आरोप करून माझी आणि पक्षाची बदनामी करण्याचा प्रयत्न काहीजणांकडून होत असल्याचे खडसेंनी सांगितले.

प्रसारमाध्यांमध्ये दिशाभूल करणारे आणि बेछूट आरोप करून माझे 40 वर्षांचे राजकीय जीवन उद्ध्वस्त करू पाहणार्‍यांचा पर्दाफाश करेन, असा ठाम निर्धार एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला.

ते शनिवारी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर मुंबईत झालेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी एकनाथ खडसे यांनी आपल्यावरील सर्व आरोप निराधार आणि दिशाभूल करणारे असल्याचे सांगितले. माझ्यावरील आरोप तथ्यहीन असेल तरी केवळ भाजपच्या आजवरच्या नैतिक मुल्यांच्या परंपरेचे पालन करण्यासाठी मी हा राजीनामा देत आहे. या सर्व आरोपांची चौकशी होऊन माझे निर्दोषत्त्व सिद्ध होईपर्यंत मी पदभार स्विकारणार नसल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले. या पत्रकारपरिषदेत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी खडसे यांची पाठराखण करताना भाजप पक्ष त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे सांगितले.
माझ्या आजवरच्या राजकीय जीवनात मी अनेक चढ-उतार पाहिले आहेत. मात्र, अशाप्रकारे बेछूट  आरोप करून मिडीया ट्रायलद्वारे एखाद्याचे राजकीय जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रकार मी पहिल्यांदाच अनुभवला आहे. माझ्यावर आरोप झाल्याच्या पहिल्या दिवसापासून मी विरोधकांना पुरावे सादर करण्याचे आव्हान दिले होते. मात्र, आजपर्यंत एकही पुरावा सादर करण्यात आलेला नाही. याउलट केवळ प्रसारमाध्यमांमध्ये आरोप करून माझी आणि पक्षाची बदनामी करण्याचा प्रयत्न काहीजणांकडून होत असल्याचे खडसेंनी सांगितले. यावेळी खडसेंनी अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. अंजली दमानिया ज्या कागदपत्रांद्वारे प्रसारमाध्यमांची दिशाभूल करत आहेत, ती सर्व माहिती मी प्रतिज्ञपत्रात नमूद केल्याचा दावाही खडसेंनी यावेळी केला. मात्र, दमानिया या केवळ लोकप्रयितेसाठी माझ्यावर आरोप करत असल्याचे खडसेंनी म्हटले.