कलेढोण : कलेढोण गावात सध्या हनुमान यात्रेचा हंगाम जोरात चालू आहे. कोणत्या पार्टीने कोणता मनोरंजनाचा कार्यक्रम आणला, कार्यक्रमासाठी किती रुपयांची सुपारी दिली अश्याच चर्चा रंगल्या आहेत. एकमेकांच्या इर्षेवर लोकप्रतिनिधी बक्कळ पैसे खर्च करत आहेत. असा सर्व पैशाचा धांगडधिंगा चालू असताना एकाबाजूला गावातील सर्वच भागात उन्हातान्हात करपून निघत ग्रामस्थ मंडळी विशेषतः महिला कुठे पिण्याचे पाणी मिळते आहे का? हि भाबडी आशा घेऊन तासनंतास रांगेत उभ्या आहेत.पण नेहमीप्रमाणे त्यांच्या पदरी फक्त निराशाच पडत आहे. एक घागर पाणी मिळाले तरी नशीब…अशी बिकट परिस्थिती सध्या कलेढोण गावावर ओढवलेली आहे. पिण्याच्या पाण्यावरून प्रकरणे भांडणापर्यंत जात आहेत.
गावात होतोय यात्रेसाठी लाखो रुपयांचा चुराडा ; स्थानिक प्रशासनास लोकांच्या पाणी प्रश्नाचा विसर
गावातील सर्व नैसर्गिक पाणीसाठा जवळजवळ संपल्यात जमा आहे. पिण्याच्या पाण्याच्या टँकर ची अजून गावात सोय झाली नाही.भूजल पातळी खालावली असल्यामुळे जमिनीतही पाणी नाही. अशी जीवघेण्या वातावरणात सामान्य माणूस जगत आहे.लोकप्रतिनिधी च्यांकडे लोक खूप आशेने जातात कि काहीतरी पाण्याची सोय होईल, शासनदरबारी काहीतरी तगादा लावून गावासाठी टँकर ची सोय करावी असे लोक नेत्यांना विनंती करतात पण कशाचे काय त्यांच्या निर्ढावलेल्या मनावर त्याचा काहीच परिणाम होत नाही. त्यांना याचीच चिंता कि मी चांगली लावण्यवती आणतो का पुढचा, यासाठी मग त्यांच्याकडे लाखो रुपये खर्च करण्याची तयारी आहे.कायमस्वरूपी पाण्याच्या प्रश्नांची सोय करण्याची तर तथाकथित नेत्यांची मानसिकता दिसत नाही त्यामुळे निदान उन्हाळ्यात तरी थोडीफार सोय करावी एवढीशीच विनंती गावकर्यांची आहे ती पण हे मस्तावलेले नेते पूर्ण करू शकत नाही.ही नक्कीच शरमेची बाब आहे.
गावात दोन पार्ट्यांच्या दोन वेगवेगळ्या यात्रा भरतात. प्रत्येकी 3-3 दिवस 6 कार्यक्रम होतात. अजून हा लाखो रुपयांचा खर्च कमी की काय बेलेवाडी, आतकरीमळा इथे वेगळ्या यात्रा भरतात.निदान या आठवड्यात लाखो रुपयांचा सहज चुराडा होतो. मनोरंजनाचे कार्यक्रम घेतले पाहिजेत, गावातील लोकांनाही तेवढेच घटकाभर मनोरंजन परंतु त्यावर किती खर्च केला पाहिजे हे हि लक्षात घेतले पाहिजे. घरात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष असताना कशाचं डोबलांच आलंय मनोरंजन ! गावातील मोठमोठे दुकानदार यात्रेसाठी हजारो रुपयांची वर्गणी देतात परंतू एखाद्या पिण्याच्या पाण्याची टँकर ची सोय करायला कुणाकडे पैसे नसतात.
हनुमानाची यात्रा सुव्यवस्थित पार पडेल, ग्रामस्थांचेही तीन दिवस चांगलेच मनोरंजन होईल .नेतेमंडळी, नातेवाईक, दुकानदार सर्व यात्रा झाल्यावर निघून जातील. स्थानिक लोकांच्या पदरी आहेच परत मग पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकणे !!
RELATED ARTICLES