सातारा : दि. 3 ते 6 जानेवारी दरम्यान, मुंबई येथील रविंद्र नाट्यमंदिराच्या प्रांगणात माणदेशी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून महोत्सवाचे हे तिसरे वर्ष असल्याची माहिती माणदेशी फौंडेशनच्या संस्थापिक अध्यक्षा चेतना सिन्हा यांनी दिली.
सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील आगळी- वेगळी संस्कृती सोबतच या माणदेशातील पारंपारीक उत्पादने व त्या सोबतच चटकदार खाद्य पदार्थ मुंबईकरांच्या भेटीला आलेत असा अनुभव यावा म्हणून माणदेशातील गावकडची संस्कृतीचे दर्शन घडविणारा आकर्षक असा देखावाही या महोत्सवात उभारला जाणार आहे.
दुष्काळी भागातील माण हा तालुका या भागातील महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने आणि महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी माणदेशी फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली.
या सेवाभावी माणदेशी फाऊंडेशन माणदेशी महोत्सव मुंबई मध्ये भरविला जातो.
जेष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ.अभय बंग,जेष्ठ समाजसेविका डॉ.श्रीमती सिंधुताई सपकाळ (माई), उद्योगमंत्री सुभाष देसाई प्रमुख पाहुणे म्हणून महोत्सवात सहभागी होणार आहे. गावाकडील संस्कृतीचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी मुंबईकरांनी या महोत्सवात येऊन आनंद घ्यावा असे आवाहन माणदेशी फाऊंडेशनच्या संस्थापिक अध्यक्षा चेतना सिन्हा यांनी केले आहे.
माण हा तालुका कायम दुष्काळी असा हा तालुका सर्वपरिचित असला तरी हा मुंबईकरांच्या भेटीलाच आला आहे असा अनुभव यावा म्हणून या तालुक्यातील गावकडची संस्कृती दाखविणारा देखावा मुंबईतील महोत्सवाच्या प्रवेशद्वारा नजिकच उभारण्यात येणार आहे.
गावाकडचे दिपस्तंभ, किल्ले, गावाची चावडी, घराचा ओटा, घरासमोरील पडवी, गुरे-ढोरे या सर्वाचा अनुभव सेल्फी पाँईट मधून मुंबईकरांना घेण्याची जणू पर्वनीच या महोत्सवात असेल. माणदेशाची खासियत असलेले माणदेशी मेंढराच्या लोकरीपासुन बनविलेली जेन,व ऊबदार घोंगडी,पारंपरिक पध्दतीची दळण्यासाठी जाती व खलबत्ते, सिंधी झाडाच्या फांद्यापासुन बनविलेल्या आकर्षक अशा केरसुण्या, बांबु पासुन तयार केलेल्या दुरड्या व सुपल्या, इत्यादी साहित्य व माणदेशी माळरानातली गावरान ज्वारी, बाजरी,मुग,मटकी,चवळी,हुलगे,जवस,इत्यादी माणदेशी कडधान्य, तसेच चटकदार चटण्या ,लोणची, सेंद्रीय गुळ,चणे- फुटाणे,काकवी,व वेगवेगळ्या मसाल्यांची चवही मुंबईकरांना चाखता येणार आहे.या महोत्सवात मुंबईकरांना स्वतः जात्याच्या उपयोग करुन मसाले,चटणी स्वतः देखील करण्याची संधी या महोत्सवात मिळु शकणार आहे.या माणदेशी महोत्सवात 90 प्रामुख्याने ग्रामीण महिलां उद्योजक आपल्या उत्पादनांद्वारे सहभागी होणार आहेत. त्याचसोबत घरच्या घरी तयार केलेल्या खास सातारी टच असलेल्या विविध चटण्या, पापड, लोणचं,खर्डा,ठेचा, शेव-पापड ते अगदी पेयांपर्यंत सारं काही उपलब्ध करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे हातमागावरच्या आणि हाताने कलाकुसर केलेल्या शाली, साड्या, दुपट्टे, ब्लाऊज, ड्रेस मटेरिअल्स देखील खरेदी करता येणार आहे.
यावर्षी बिहार येथील मधुबनी, खणाच्या साड्या, कसुती वर्क (लहान मुलांसाठी सर्व प्रकारचे कपडे)आणि कलकत्ता येथील कारागीरांना देखील महोत्सवासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.
यंदाची खासीयत – सुफी संगीताचा लाइव्ह अनुभव सोनम कार्लरा यांच्यासोबत घेता येणार आहे. तर मृदुला दोढे जोशी यांच्या संगीतामध्ये मंत्रमुग्ध होता येणार आहे.
मुंबईकरांना गावाकडील संस्कतीचा प्रत्यक्ष अनुभव
महोत्सवाचे आणखी प्रमुख आकर्षण म्हणजे बारा बलुतेदार. बारा बलुतेदार हे आपण फक्त पुस्तकात वाचलेले असते. पण ग्रामसंस्कृतीचा कणा असलेले सुतार, लोहार, कुंभार यांची थेट हस्तकला येथे पाहण्यास आणि अनुभवण्यास मिळणार आहे. आपण स्वत:च्या हाताने मडकं वा लाटणं बनवू शकता किंवा फेटा बांधायचा कसा हे शिकू शकता.
तसेच चपला तयार करणारे, दागिने बनविणारे किंवा कपडे विणणार्या कलाकारांची कला पाहू शकता. दररोज संध्याकाळी माणच्या मातीचं दर्शन घडविणारे खेळ, लोकनृत्य, लोकसंगीत यांचा देखील आस्वाद उपस्थितांना घेता येणार आहे. खास माण तालुक्यातील गजी लोकनृत्याचा आस्वाद देखील या महोत्सवादरम्यान घेता येणार आहे.
एका सायंकाळी उपस्थितांना महिला कुस्त्यांची दंगल पाहण्याचा आनंद घेता येणार आहे.
माणदेशी महोत्सवातील यंदाचे मुख्य आकर्षण
यंदा माणदेशी महोत्सवाचे मुख्य आकर्षण माणतालुक्यातील आर.जे केराबाई यांच्या त्यांनी स्वतः लिहिलेल्या आणि स्वरबद्ध केलेल्या सीडीचे उद्घाटन होणार आहे. तर सामाजिक संदेश देणार्या पथनाट्याचा प्रयोग होणार आहे. तसेच प्रसिद्ध गायक मृदुला दाढे-जोशी आणि केराबाई यांची संगीत जुगलबंदी ऐकायला मिळणार आहे.
माणदेशी फाऊंडेशनच्या अध्यक्षा चेतना सिन्हा या जानेवारी 2018 मध्ये दावोस-स्विझर्लंड येथे होणार्या वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्या सह-अध्यक्ष आहेत. ही खरंच खूप अभिमानास्पद अशी बाब आहे.माणदेशी फाऊंडेशनच्या माध्यमातून तीन लाख महिलांनी व्यवसाय प्रशिक्षण घेऊन आपले व्यवसाय यशस्वी केले आहेत.
सध्या महाराष्ट्र, दादरा, नगर-हवेली, कर्नाटकमध्ये माणदेशी फाऊंडेशन एकून 11 व फिरत्या व्यवसाय प्रशिक्षण केंद्रासह सहा शाखा कार्यरत आहेत.
माणदेशी महोत्सवाचे मुंबईत तीन ते सहा जानेवारी दरम्यान आयोजन उत्सवाचे मुंबईत यंदाचे तिसरे वर्ष; रविंद्र नाट्यमंदिराच्या प्रांगणात भरणार महोत्सव
RELATED ARTICLES