मसूर ः सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक आदरणीय स्वर्गीय पी.डी.पाटीलसाहेब यांच्या 1 जुलै या जन्मदिनाचे औचित्य साधून, शासनाच्या वृक्ष लागवड अभियानांतर्गत कारखान्यानजीकच्या महादेव डोंगर उतारावर मुख्य वनसंरक्षक मा.डॉ.व्ही.क्लेमेंट बेन (भा.व.से) यांच्या शुभहस्ते व उपवनसंरक्षक मा.डॉ.भारतसिंह हाडा आणि कारखान्याचे चेअरमन मा. आमदार श्री बाळासाहेब पाटील, व्हाईस चेअरमन सौ.लक्ष्मीताई गायकवाड व संचालक मंडळाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सोमवार 1 जुलै, 2019 रोजी दुपारी 4.00 वाजता वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांनी दिली.
कारखान्याने आजवर केलेल्या वृक्षारोपणासंबंधात श्री पाटील पुढे म्हणाले की, कारखान्याचे संस्थापक आदरणीय पी.डी.पाटीलसाहेब यांच्या धोरणानुसार प्रती वर्षी कारखाना परिसरामध्ये वृक्षारेापण करण्यात येते.
कारखान्याचे विद्यमान चेअरमन आमदार बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना मालकीच्या 20 एकर क्षेत्रावर अनेक प्रकारची झाडे लावून ती उत्तमप्रकारे जोपासल्याबद्दल महाराष्ट्र शासनाने प्रथम क्रमांकाचा वनश्री पुरस्कार देवून कारखान्याचा गौरव केलेला आहे. तद्नंतर वृक्षारेापणासाठी राज्यशासनाकडून कारखान्यास मिळालेल्या महादेव डोंगर उतारावरील 44 हेक्टर क्षेत्रापैकी गतवर्षी 5 हेक्टर क्षेत्रावर 2500 रोपांसह आजवर एकूण 25 हेक्टर क्षेत्रावर वृक्षारोपण करण्यात येवून, त्यांची उत्तम प्रकारे जोपासना होण्यासाठी त्याठिकाणी वनतळे, सिमेंटचे पाणी साठवण बंधारे बांधून ठिबक सिंचन संचाने व टँकरद्वारे पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
दरम्यान सकाळी ठिक 10.30 वाजता कारखान्याच्या मेन गेटवर आदरणीय पी.डी.पाटीलसाहेब आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. यंदाही सोमवार 1 जुलै, 2019 रोजी आणखी 2500 रोपांची लागण महादेव डोंगर उतारावर करण्यात येणार असून, सदरच्या वृक्षारोपण समारंभास सभासद, शेतकरी, कर्मचारी यांनी अगत्य उपस्थित रहावे, असे आवाहन कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांनी केले आहे.
सह्याद्रिच्या कार्यस्थळावर 1 जुलै रोजी वृक्षारोपण
RELATED ARTICLES