सातारा : कोजागिरी पोर्णिमेदिवशी सुरुचि बंगल्यावर राडा झाला होता. याप्रकरणी शिवेंद्रराजे गटाकडून दाखल अॅड. विक्रम पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला होता. याच गुन्ह्याचे चार्जशीट (दोषारोपपत्र) मंगळवारी दाखल झाले. खासदार उदयनराजे भोसले व त्यांच्या समर्थकांविरोधात पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेंदरे यांनी 100 पानी दोषारोपपत्र दाखल केले आहे. यापूर्वी शिवेंद्रराजे गटाविरोधात 500 पानी दोषारोपपत्र 4 जानेवारीला दाखल झाले होते.
खा. उदयनराजे भोसले यांच्यासह अजिंक्य मोहिते, सनी भोसले, बाळू ढेकणे, इम्तियाज बागवान, किरण कुर्हाडे, केदार राजेशिर्के, अदि 33 आरोपीविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, बेकायदा जमाव जमवुन गर्दी, मारामारी करणे, शस्त्रबंदी-जमावबंदी आदेशाचा भंग, आर्म अॅक्ट आदि कलमान्वये गुन्हे दाखल आहेत.
आनेवाडी टोलनाका हस्तांतराच्या वादातुन आ. शिवेंद्रसिंहराजे आणि खा. उदयनराजे भोसले यांच्या दोन्ही गटात दि. 5 आक्टोबर रोजी सुरूची बंगला येथे हाणामारी तोडफोड झाली होती. या राड्यावेळी गोळीबार झाला होता.
याप्रकरणी पोलिस निरिक्षक किशोर धुमाळ यांनी खा. उदयनराजे भोसले व आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह 250 जणांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवला होता. तपास पोलिस उपअधिक्षक राजलक्ष्मी शिवणकर यांच्याकडे आहे. या प्रकरणातील पहिले 500 पानी दोषारोपपत्र दि. 4 जानेवारीला जिल्हा न्यायालयात दाखल केले होते.
शिवेंद्रराजे गटाच्या फिर्यादीच्या गुन्ह्याचा तपास पोलिस निरिक्षक बेंदरे यांच्याकडे आहे. एकूण 33 आरोपी यामध्ये असल्याचे दोषारोपपत्रात नमूद आहे. त्यामधील 27 आरोपी अद्याप फरार आहेत. तर 6 जणांना अटक करण्यात आलेली आहे. फरारी आरोपी विरोधात पुरवणी दोषारोपपत्र देण्याची तयारी असल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले.