ढेबेवाडी : एसटी बसच्या पुढील चाकाखाली सापडून शाळकरी मुलीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी सातच्या सुमारास ढेबेवाडी-कराड मार्गावरील गुढे, (ता.पाटण) गावाजवळ घड़ली. समृध्दी भरत कदम (वय 15 रा.गुढे, ता.पाटण) असे मृत मुलीचे नाव असून सकाळी तळमावले, (ता.पाटण) येथे शाळेत जाताना हा अपघात झाला.
याबाबत घटनास्थळी ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार, समृध्दी तळमावले येथील श्री वाल्मिकी विद्यामंदीरात दहावीच्या वर्गात शिकते. आज सकाळी ती नेहमीप्रमाणे शाळेत जाण्यासाठी मैत्रिणींसोबत गावाजवळच्या बस थांब्याजवळ आली होती. त्यावेळी ढेबेवाडीकडून कराडकडे निघालेली कराड आगाराची बस पकडताना (क्रमांक एमएच 14 बीटी 3665) ती बसच्या पुढील चाकाखाली सापडून चिरडली गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर घटनास्थळी ग्रामस्थ व नातेवाईंकांची गर्दी झाली होती. येथील पोलिसांना याबद्दल समजताच सहाय्यक पोलिस निरिक्षक उत्तम भजनावळे व त्यांच्या सहकार्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
बसच्या चालक व वाहकांनी घटनास्थळावरून पोलिस ठाण्यात धाव घेतली. या घटनेची माहिती दिली. समृध्दी अत्यंत हुशार विद्यार्थीनी होती. विद्यालयातील विविध उपक्रमांतून तिचा सहभाग असायचा. तिच्या अपघाती निधनाचे वृत समजताच विद्यालयासह गुढे परिसरावर शोककळा पसरली आहे. अपघाताचा गुन्हा नोंदविण्याची प्रकीया सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. गुढे गावातून ढेबेवाडी-कराड रस्त्यावर येण्यास तीव्र उतार असून या मार्गावर सतत वाहनांची वर्दळ असते. वाहनांचा वेग नियंत्रणात रहावा यासाठी त्या ठिकाणी झेब्रा क्रॉसींगचे पट्टे तयार करण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
एसटीच्या चाकाखाली सापडून शाळकरी मुलीचा जागीच मृत्यू
RELATED ARTICLES

