भुईंज : खादी केवळ वस्त्राचा प्रकार नसून ती एक जगण्याची कला आहे. खादीचा प्रत्येक धागा हा शंभर टक्के शुद्ध असतो. त्यामुळेच त्याच्या पेहरावाने विचारांतही शुद्धता येते. अशा खादीचा संस्कार करणारी खूप मोठी माणसं आयुष्यात आली आणि त्यामुळेच खादी हा विचार झाला. हा विचार जेवढा व्यापक होईल तेवढं समाजाचे भले होणार आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ सिने दिग्दर्शक राजदत्त यांनी किसनवीरनगर, ता. वाई येथे केले. किसनवीरनगर येथे सुरु असणार्या नामयज्ञ सोहळा आणि कृषि व पुष्प प्रदर्शनाच्या निमित्ताने नागपूर येथील महाराष्ट्र खादी ग्रामोद्योग संघाच्यावतीने उभारण्यात आलेल्या खादी स्टॉलचे उदघाटन राजदत्त यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. राजदत्त पुढे म्हणाले, अभय बंग यांचे वडिल ठाकुरदास बंग यांनी माझ्यावर खादीचा मुख्य संस्कार केला. त्यासोबतच दादा धर्माधिकारी, मधुकरराव चौधरी अशी कितीतरी मोठी माणसं मला हा विचार देत गेली. याच विचारांतून खादीशी निगडीत असणारी जडणघडण कृतिशील झाली. खादी ग्रामोद्योगचे नितेश बिनकर म्हणाले, या स्टॉलवर चरख्यावर तयार करण्यात आलेल्या खादीची कपडे विक्रीस ठेवण्यात आली आहेत. महाराष्ट्रासह राजस्थान, गुजरात, बिहार, उत्तरप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा आदी राज्यात तयार होणार्या खादीचे कापड व कपडे हे या स्टॉलचे वैशिष्ट आहे. विशेष म्हणजे नैसर्गिक रंगाचे खादी कापड व कपडे देखील येथे उपलब्ध केल्याने त्यास विशेष पसंती मिळत आहे. खादीच्या कापडासह खादीच्या कपड्याचे शर्ट, नेहरु कुर्ता, जॅकेट, साडी, लेडीज कुर्ता, टॉवेल आदी विविध प्रकार उपलब्ध आहेत. महात्मा गांधींजीच्या 150 व्या जयंतीनिमित्त खादीचा प्रचार व प्रसार करण्याचा कार्यक्रम राज्य शासनाने हाती घेतला आहे. त्याच कार्यक्रर्मांतर्गत किसनवीरनगर येथे जनतेला खादीचे कापड व कपडे उपलब्ध करुन दिले आहेत. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष गजानन बाबर, संचालक रतनसिंह शिंदे, चंद्रकांत इंगवले, नंदकुमार निकम, सचिन साळुंखे, मधुकर शिंदे, चंद्रसेन शिंदे, अरविंद कोरडे, ऋतुराज चव्हाण, भुईंजचे उपसरपंच प्रशांत जाधवराव, हणमंत गायकवाड, अमर धुमाळ, वाई तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष विशाल डेरे, दत्तात्रय शिंदे आदी उपस्थित होते.
खादी ही तर जगण्याची कला : ज्येष्ठ सिनेदिग्दर्शक राजदत्त
RELATED ARTICLES

