वडूज : पेडगाव ता.खटाव येथील माजी सैनिक अशोकराव जगदाळे यांनी आपल्या दिवंगत आई-वडील तसेच दिवंगत भाऊ-भावजयीच्या स्मरणार्थ दिवडी रस्त्यावर श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज व विठ्ठल रूक्मिणी मंदिराचे बांधकाम स्वखर्चातून केले. या मंदिरात नुकतीच संत-महंतांच्या उपस्थितीत मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना व कलशारोहन सोहळा उत्साहात संपन्न झाला.
जगदाळे यांनी आपले दिवंगत वडील कै. तुकाराम नाथा जगदाळे, मातोश्री कै. तानुबाई जगदाळे, बंधू कै. तुकाराम जगदाळे, भावजयी सरुबाई जगदाळे यांच्या स्मरणार्थ सुमारे 5 लाख रूपये खर्चुन मंदिर बांधले आहे. मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त सलग तीन दिवस मूर्ती व कलशाची भव्य मिरवणूक, हरीपाठ व रात्री ह.भ.प. विजय शिंदे लोणीकर यांचे सुश्राव्य किर्तन, धार्मिक कार्यक्रम, सुदाम पालवे अहमदनगर यांचे किर्तन यांचे आयोजन केले होते. दिवडी येथील त्र्यंबकानंद काटकर महाराज यांच्या हस्ते कलशारोहन करण्यात आले. यावेळी तुकाराम बिजेनिमित्त नवनाथ जगदाळे यांचे किर्तन, फुलांचा कार्यक्रम झाला. त्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात आले.
पेडगाव येथे आई-वडिलांच्या स्मरणार्थ मंदिराचे बांधकाम
RELATED ARTICLES

