Friday, April 25, 2025
Homeताज्या घडामोडीयात्रेच्या निमित्ताने बेटी बचाओ अभियानास मदत

यात्रेच्या निमित्ताने बेटी बचाओ अभियानास मदत

वडूज: खटाव-माण तालुक्यात गावोगावी यात्रा-जत्रांचा हंगाम सुरु आहे. यात्रेच्या निमित्ताने अनेक ठिकाणी पै-पाहुण्यांची वर्दळ सुरु असते. अशावेळी वेगवेगळे उपक्रम राबवून गावातील प्रमुख कार्यकर्ते चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र प्रचलित चमकोगिरीला फाटा देत तडवळे (ता. खटाव) येथील सुपुत्र व ओगलेवाडी येथील साई इंजिनिअरिंगचे संचालक उद्योगपती वसंतराव दिनकर खाडे यांनी एक आगळा उपक्रम राबविला आहे. त्यांनी ग्रामदैवत भैरवनाथाच्या यात्रेनिमित्ताने सोळा लाख रुपयांची ठेव पावती केली आहे. या ठेव पावतीच्या व्याजातून ते वर्षभरात जन्मलेल्या प्रत्येक मुलींच्या आई-वडिलांस पाच हजार रुपयांची आर्थिक मदत करणार आहेत. त्यांच्या या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, ग्रामीण भागातील यात्रा म्हंटली की, देवाचा छबीना, दुसर्‍या दिवशी लोकनाट्य तमाशा, कुस्तीचा फड, काही वर्षापूर्वी बैलगाडीच्या शर्यती, रात्री ऑर्केस्ट्राचा करमणूक कार्यक्रम, कुस्त्या दिवशी आलेल्या पै-पाहुणे व मित्र मंडळींना भन्नाट मांसाहारी जेवण देणे अशी पध्दत रुढ आहे. गांव कितीही मोठे असले तरी यात्रेच्या कार्यक्रमात पुढारपण करण्याची संधी मोजक्याच लोकांना मिळत असते. अशा परस्थितीत अनेकजण गावासमोर व पै-पाहुण्यांसमोर चमकण्यासाठी वेगवेगळे फंडे राबवत असतात. काहीजण मुख्य चौकात फ्लेक्सच्या माध्यमातून आपली मोठी छबी व आजुबाजूला गल्ली बोळातील पाच-पन्नास जणांचे फोटो लावून नेतेगिरी दर्शवतात. काहीजण प्रतिष्ठेबरोबर अन्नदानाचे पुण्य घेण्याच्या उद्देशाने मोठ्या जेवणावळी घालतात. यापैकी काहीच न जमणारे करमणूकीच्या कार्यक्रमात मध्येच धडपडत उठून बाई वाड्यावर या अश्या प्रकारच्या गाण्यांची मागणी करत मध्ये मध्ये उठ बस करत असतात. प्रसंगी एखाद्या दुसर्‍या गाण्यास पन्नास, शंभर रुपयांचे बक्षीस देवून आपल्या नावाचा चारवेळा पुकारा करुन घेतात. तर काही जण कुस्तीच्या फडात पहिल्यांदा एखाद्या कोपर्‍यात बसतात. व एखाद्या दुसर्‍या निकालाबाबत पब्लीकमधून गोंधळ ऐकल्यानंतर तोच धागा पकडून मैदानात उतरतात. व उसने आवसान आणून आम्हीबी वर्गणी दिली आहे. आमच बी ऐकल पाहिजे असे म्हणत आपले अस्तित्व दाखवून देतात.
या सर्व गोष्टीला फाटा देत उद्योगपती वसंतराव खाडे यांनी गेल्यावर्षी यात्रेच्या निमित्ताने गावातील जिल्हा बँकेच्या शाखेत सोळा लाख रुपयांची ठेव पावती ठेवली आहे. त्या ठेव पावतीच्या व्याजातून भैरवनाथ पालखी मार्ग काँक्रीटीकरण केले. चालू वर्षी मिळणार्‍या एक लाख आठ हजार रुपये व्याजाच्या रकमेत ते भैरवनाथ कन्यारत्न योजना राबवणार आहेत. शुक्रवार दि. 26 एप्रिल 2019 पासून 2020 च्या पालखी दिवसापर्यंत जन्मास येणार्‍या गावातील प्रत्येक मुलीच्या आईच्या नावाने ते बँकेत 5 हजार रुपयांची ठेव पावती करणार आहेत.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular