सातारा : सातारा जिल्हा क्रांतीसिंहनाना पाटील रुग्णालयातील कर्मचार्यांना मार्च महिन्याच्या वेतनाचे आश्वासन मिळाल्याने सिव्हिलच्या 275 गुरुवारी आंदोलन मागे घेतले . शुक्रवारी कर्मचार्यांच्या खात्यावर वेतन जमा होईल असे स्पष्टीकरण कोषागार कार्यालयाने दिले. या प्रकरणी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. उज्ज्वला माने यांनी पाठपुरावा केला. काम बंद आंदोलनामुळे रूग्णालय व्यवस्था कोलमडली होती ती पुन्हा दुपारनंतर पूर्ववत झाली.
सातव्या वेतन आयोगाच्या निश्चिततेसाठी चतुर्थ श्रेणी कर्मचार्यांच्या सेवांचे व वेतनांचे नियमन काळजीपूर्वक सुरू आहे. आधी मार्च ऑडिट त्यानंतर वेतन निश्चितीसाठी पगारपत्रकाची तांत्रिक तपासणी यामुळे पगाराला विलंब झाल्याचे कोषागार कार्यालयातून सांगण्यात आले. यानंतर शासकीय रूग्णालयामधून जी बीले तपासणीसाठी कोषागार कार्यालयात गेली, त्या बिलांमध्ये त्रुटी काढण्याचे काम वारंवार होत गेल्याने हा वाद जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्यासमोर गेला. या दोघांच्या वादामुळेेच कर्मचार्यांचा पगार थकला असल्याचा आरोप शासकिय रूग्णालयातील कर्मचार्यांनी आंदोलनस्थळी बोलताना केला होता. मात्र या वेतन प्रणालीत कधी ऑनलाईन कधी ऑफलाईन वेतनाच्या अडचणी होतात प्रत्यक्षात कोणाचे वेतन थकवण्याचा प्रश्नच येत नाही असे स्पष्टीकरण प्रशासन विभागाने दिले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडी कर प्रशिक्षणासाठी गेल्याने प्रभारी चार्ज असणार्या अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. उज्ज्वला माने यांनी परिस्थिती सांभाळत कोषागार अधिकार्यांशी चर्चा करून शुक्रवारी तातडीने वेतन जमा होईल अशी व्यवस्था केली. 275 कर्मचार्यांनी चर्चा करून डॉ. माने यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित केले. वेतनाअभावी कर्मचार्यांचे आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. बँकांचे हप्ते वेळेवर न भरल्याने अनेकांना दंडाचा भुर्दंड सहन करावा लागला आहे. मार्चच्या पगारास विलंब झाल्याने एप्रिल व त्यापुढील महिन्यांचेही पगार पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जात होती मात्र वेतन प्रलंबित राहणार नाही असे आश्वासन कोषागार कार्यालयाने दिले आहे.
वेतनाच्या आश्वासनानंतर सिव्हिलचे आंदोलन मागे
RELATED ARTICLES