सातारा : जिल्ह्यात उद्भवणार्या संभाव्य आपत्तीच्या निवारणासाठी तिच्या व्यवस्थापनासाठी सर्वच यंत्रणांनी आपापसात समन्वय ठेवत सज्ज रहावे. तसेच संबंधित विभागानी आपत्ती नियंत्रण कक्ष 1 जून पासून कार्यान्वीत करावा, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांनी आज केल्या.
नैसर्गिक आपत्ती बाबत मान्सूनपूर्व तयारीची आढावा बैठक अपरजिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली तर मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे यांच्या प्रमुख उपस्थिती आज जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात संपन्न झाली. यावेळी अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड बोलत होते. या बैठकीला प्रांताधिकारी स्वाती देशमुख-पाटील, हिम्मत खराडे, संगीता चौगुले, श्रीरंग तांबे यांच्यासह संबंधित तालुक्यांचे तहसीलदार उपस्थित होते.
पावसाळ्यात दरड कोसळण्याची शक्यता असते अशा ठिकाणची पहाणी करावी, अशा सूचना करुन अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड पुढे म्हणाल्या, संबंधित सर्व यंत्रणांनी आपत्ती व्यवस्थापनेचा आराखडा तयार करुन सर्वप्रथम आपले नियंत्रण कक्ष स्थापन करावेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांवरील खड्डे बुजवून घ्यावे तसेच धोकादायक पुलांची पाहणी करुन तसा अहवाल सादर करावा. पावसाळ्यात दूषीत पाण्याचा पुरवठा होणार नाही याची खबरदारी घ्यावी. प्रत्येक विभागाने नोडल ऑफीसरची नियुक्ती करुन त्यांची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला द्यावी. ज्या गावांचा संपर्क पावसाळयात तुटतो अशा गावांसाठी पुरेशा जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा अधिच करावा. अधिकार्यांचे मोबाईल क्रमांक, नियंत्रण कक्षाचे दूरध्वनी क्रमांकांची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तसेच अन्य यंत्रणांना द्यावीत, नगरपालिका, ग्रामपंचायत हद्दीतील नालासफाई, गटारी यांची साफसफाई करुन घ्यावी. आरोग्य विभागाने आवश्यक तो औषध साठा, रुग्णवाहिका यंत्रणा सज्ज ठेवावी त्याचबरोबर वीजवाहक तारांना अडथळा निर्माण करणार्या झाडांच्या फांद्या तोडाव्यात, अशा सूचनाही अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांनी शेवटी केल्या.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे म्हणाले, गावागावातील सर्व नाल्यांची साफसफाई करावी, पावसाळ्यापूर्वी बंधार्यांची दुरस्ती करावी. दुर्गम भागातील विद्युत पोल वाकलेले आहे ते विद्युत वितरण कंपनीने तात्काळ बदलावेत. जिल्हा परिषदेंच्या शाळांचे ऑडीट करुन मुख्यापकांचे प्रमाणपत्र घ्यावे. विभाग प्रमुखांनी मान्सूम काळात गांभीर्यपूर्व काम करा, अशा सूचनाही त्यांनी शेवटी केल्या. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनिल बोरकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर, यांच्यासह, गटविकास अधिकारी व नगरपरिषदांचे मुख्याधिकारी, संबंधित विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज रहावेः साहेबराव गायकवाड
RELATED ARTICLES

