Wednesday, November 5, 2025
Homeताज्या घडामोडीउत्तर कोरेगाव तालुक्यातील टंचाईग्रस्त भागाची जिल्हाधिकार्‍यांकडून पहाणी ; पिंपोडे सर्कलमधील सरपंचाशी साधला...

उत्तर कोरेगाव तालुक्यातील टंचाईग्रस्त भागाची जिल्हाधिकार्‍यांकडून पहाणी ; पिंपोडे सर्कलमधील सरपंचाशी साधला संवाद

 

सातारा: नांदवळ तलावात चार विहिरी खोदण्यात आल्या असून या विहिरींमध्ये वसना-वांगना उपसासिंचन योजनेचे पाणी सोडले जात आहे. या विहिरींमधील पाणी नांदवळ, सोळशी, नायगाव व सोनके या गावांना पिण्यासाठी देण्यात येत आहे. या नांदवळ तलावावरील नळ पाणी पुरवठा योजनेची जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी आज पहाणी करुन 31 गावांच्या सरपंचांशी संवाद साधला.
नांदवळ तालावातचार विहिरी भोवती चर खोदून ते पाणी पाझराद्वारे विहिरीत सोडले जात आहे. चरांमध्ये त्यात पाझर फुटणारा भराव टाकावा, अशी मागणी सरपंचांनी केली. या चरांमध्ये तात्काळ वाळू टाकावी, असे आदेश जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी यावेळी दिले. रणदुल्लाबाद गावाला उच्च दाबाने पाणी मिळत नसल्याचे तिथल्या सरपंचांनी सांगितले. यावर जिल्हाधिकारी या गावाला उच्च दाबाने पाणी मिळावे यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. शेंदूरजणे गावाला पाणी देण्याची व्यवस्था केली आहे, तेथील सार्वजनिक विहिरीचा प्रस्ताव प्रांताधिकारी यांनी सादर करावा त्याला तात्काळ मंजूरी देण्यात येईल. रामोशीवाडी गावच्या सरपंचांनी जिहे-कठापूर योजनेचे पाणी मिळालेतर गावची कायमस्वरुपी पाण्याची समस्या मिटेल, असे सांगितले. यावर जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी रामोशीवाडीला तांत्रिक दृष्टया जिहे-कठापूरचे पाणी देणे शक्य नाही कायम स्वरुपी पाणी पुरवठ्या योजनेसाठी स्वतंत्र प्रस्ताव द्यावा हा प्रस्ताव शासनाकडे पाठविला जाईल, असे सांगितले.
टंचाईच्या काळता पाण्यावाचून एकही गाव वंचित राहणार नाही. गावच्या मागणीनुसार टँकरने पाणी पुरवठा केला जाईल. नायगाव या गावाला सध्या 3 टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. ज्यादाची मागणी आल्यास तहसीलदार व गटविकास अधिकार्‍यांनी पहाणी करुन लवकरात लवकर टँकर सुरु करावेत.
तसेच पशुधन अधिकार्‍यांनी उपलब्ध चार्‍याची पडताळणी करुन अहवाल सादर करावा, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी केल्या. यानंतर जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी वडूथ येथील टँकरची फिडीग पॉईंटची पहाणी करुन तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना योग्य त्या सूचना केल्या.
टंचाईच्या काळात लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल ह्या वाड्या वस्त्यांवर जात आहेत, बहुधा या पहिल्याच अशा जिल्हाधिकारी आहेत. त्यांच्या कार्यक्षमतेमुळे बर्‍याच टंचाईच्या समस्या त्यांनी दूर केल्या आहेत. टंचाईच्या काळात जिल्हा प्रशासन संवेदनशिल तत्परतेपणे काम करीत आहेत, असे गौरवौदगार जिल्हा परिषद सदस्य मंगेश धुमाळ यांनी यावेळी काढले.
यावेळी कोरेगावच्या तहसीलदार शुभदा शिंदे, गटविकास अधिकारी शरद मगर यांच्यासह नांदळवळ, रामोशीवाडी, पिंपोडे, राऊतवाडी, मोहितेवाडी, बनवडी, सोळशी भावेनगर आदी गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular