कोरेगाव: कोरेगाव शहरातील मोठे उपनगर असलेल्या शांतीनगर येथे नगरपंचायतीने सुरु केलेल्या भुयारी गटार योजनेचे काम राजकीय हेतूने बंद पाडणार्यांच्या निषेधार्थ नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, नगरसेवक आणि नागरिकांनी सोमवारी तहसीलदार कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले. या उपोषणात भाग घेत भाजपचे युवा नेते महेश शिंदे व माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर बाचल यांनी पाठिंबा दिला आहे.
शहरातील प्रभाग क्र. 7 व 8 मधील नागरिकांच्या हितासाठी आणि दरवर्षी पावसाळ्यात होणारी गैरसोय टाळण्यासाठी नगरपंचायतीने सुमारे 72 लाख रुपये खर्चुन भुयारी गटार योजनेचे काम सुरु केले आहे.
या योजनेबाबत काही नागरिकांनी राजकीय हेतूने तक्रारी केल्या आणि प्रशासनाला वेठीस धरले. याबाबत जिल्हाधिकार्यांनी चौकशी केली असून, काम अंदाजपत्रकाप्रमाणे सुरु असल्याचे संयुक्त चौकशी समितीने कळविले देखील आहे. मात्र राजकीय हेतूने जाणीवपूर्वक काम बंद पाडून काही जणांनी प्रशासनाला वेठीस धरले आहे.
नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, नगरसेवक बाळासाहेब बाचल, महेश बर्गे, नगरसेविका शुभांगी राहूल बर्गे, साक्षी सुनील बर्गे, पूनम अमोल मेरुकर, सुनील बर्गे, राहूल रघुनाथ बर्गे, निवास मेरुकर, अॅड. चंद्रशेखर बर्गे, गोविंदराव सपकाळ, एन. व्ही. बर्गे, राजेश बर्गे यांच्यासह परिसरातील नागरिक, युवक कार्यकर्ते व महिलांनी तहसीलदार कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले. भाजपचे युवा नेते महेश शिंदे व माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर बाचल यांनी उपोषणस्थळी भेट देऊन पाठिंबा दिला आहे. राहूल रघुनाथ बर्गे व भाजयुमोचे शहराध्यक्ष श्रीकांत बर्गे यांनी उपोषण करण्यामागील भूमिका विषद केली. यावेळी परिसरातील नागरिक, युवक कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या.
शांतीनगर भुयारी गटार योजनचे काम राजकीय हेतूने बंद पाडणार्यांच्या निषेधार्थ नगराध्यक्ष, नगरसेवक व नागरिकांचे उपोषण
RELATED ARTICLES

