कराड : राज्यातील प्रत्येक नगरपालिका कार्यक्षेत्रात व तालुक्यात पत्रकार भवन निर्माण करण्यासाठी राज्य शासनाने स्वतंत्र निधी द्यावा आणि पत्रकार घरकुल योजना राबवण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी प्रसार माध्यम संपादक पत्रकार परिषदेच्यावतीने अध्यक्ष गोरख तावरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथे कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आल्यानंतर प्रसारमाध्यम संपादक पत्रकार परिषदेचे अध्यक्ष गोरख तावरे, पत्रकार सतीश मोरे, संपादक शशिकांत पाटील, देवदास मुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिले.
यावेळी सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन बानुगडे पाटील, कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ सुरेश भोसले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्रातील प्रत्येक शहरांमध्ये सर्व सुविधायुक्त पत्रकार भवन उभे करण्यासाठी राज्य सरकारने सर्वतोपरी मदत करावी. पत्रकारांना हक्काचे पत्रकार भवन व घरकुल असावे यासाठी राज्य सरकारने सकारात्मक प्रयत्न करून निर्णय घ्यावा. पंतप्रधान आवास योजनेतून घरकुल बांधण्याचा निर्णय घ्यावा.
राज्यातील प्रत्येक तालुक्यात पंतप्रधान आवास योजनेमधून पत्रकारांसाठी घरकुल उपलब्ध व्हावेत, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पत्रकारांसाठी निवास व्यवस्था व पत्रकार भवनासाठी जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा, यासाठी प्रसारमाध्यम संपादक पत्रकार परिषद प्रयत्नशील आहे. म्हाडामधून पत्रकारांना घरकुल दिल्यास पत्रकारांची निवास व्यवस्था होईल. त्याचबरोबर सर्व सुवियांसह पत्रकार भवन राज्यातील प्रत्येक नगरपालिका कार्यक्षेत्रात व तालुकास्तरावर असावे अशी मागणीही निवेदनात करण्यात आलेली आहे. राज्यामध्ये लघु – मध्यम वृत्तपत्रांतबरोबरच साखळी वर्तमानपत्र प्रसिद्ध होत आहेत. यामध्ये काम करणारे पत्रकार हे बहुतांश करून ग्रामीण भागातील आहेत. पत्रकारिता करीत असताना सर्वच पत्रकारांना बातम्या लिहिण्यासाठी अथवा त्या आपल्या वर्तमानपत्रापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व शहरांमध्ये, सर्व सुविधा आहेत असे नाही. यामुळे तालुकास्तरावर पत्रकार भवन होणे अत्यंत आवश्यक आहे. याचा विचार करून कराडमध्ये पत्रकार भवन निर्माण केलेले आहे.
वृत्तपत्रांमध्ये काम करणारे पत्रकार हे अल्प मानधन, वेतनामध्ये प्रामाणिक काम करीत असतात, मात्र त्यांना सर्व सुविधा उपलब्ध होत नाहीत. लोकशाहीचा चौथास्तंभ म्हणून वृत्तपत्रांचा उल्लेख होतो, मात्र घटनेमध्ये चौथास्तंभ म्हणून वृत्तपत्रांना कोणताही अधिकृत अधिकार बहाल केलेला नाही.
दरम्यान राज्य शासनाने पत्रकारांसाठी सकारात्मक भूमिका घेऊन पत्रकार भवन व घरकुल योजना राबवावी, सदर निवेदनाचा सकारात्मक विचार करून राज्य सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा, म्हणजे हे पत्रकारांसाठी उचललेले पाऊल सकारात्मक आहे अशी पत्रकारांची धारणा होईल आणि महाराष्ट्राला दिशादर्शक ठरेल. असे प्रसार माध्यम संपादक पत्रकार परिषदेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.
पत्रकार घरकुल योजना राबवण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी: गोरख तावरे
RELATED ARTICLES

