Wednesday, December 3, 2025
Homeताज्या घडामोडीपंख पावलांना लाभले, स्वप्न डोळ्यातील जपले

पंख पावलांना लाभले, स्वप्न डोळ्यातील जपले

भुईंज : स्त्री शिक्षणाबाबत मोठ्या प्रमाणावर जागृती निर्माण झाली असली तरी आजही विशेषत: वाडी वस्तीवरील मुलींसमोरील शिक्षणासाठीच्या समस्यांचा पुर्णत: निपटारा झाला नाही. पाच ते सात किलोमीटर अंतरावरच्या गावी चालत जावून शिक्षण घेणार्‍या विद्यार्थीनींची संख्या ग्रामीण भागात आजही मोठी आहे. अशाच विद्यार्थीनींच्या पावलांना पंख देण्याचे, त्यांच्या डोळ्यातील शिक्षणाचे स्वप्न जपण्याचे काम रमेश गरवारे चॅरिटी ट्रस्टने करत भुईंज येथील प्रियदर्शनी गर्ल्स हायस्कूलमधील 30 विद्यार्थीनींना सायकल आणि विद्यालयातील सर्वच विद्यार्थीनींना शैक्षणिक साहित्याचे मोफत वितरण केले. रोजची खडतर वाट सहज झाल्याने या वाडीवस्तीवरील विद्यार्थीनींच्या चेहर्‍यावर फुललेल्या आनंदाने उपस्थित सर्वांनाच या उपक्रमाचे मोल उमजले.
श्री महालक्ष्मी शिक्षण संस्थेच्या भुईंज येथील प्रियदर्शनी गर्ल्स हायस्कूल, महिला कनिष्ठ महाविद्यालय आणि प्रियदर्शनी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी रमेश गरवारे चॅरिटी ट्रस्टने हा उपक्रम राबवला. यावेळी विद्यार्थीनींना सायकल तसेच शैक्षणिक साहित्याचे वाटप तसेच शासनातर्फे देण्यात येणार्‍या मोफत पाठ्यपुस्तकाचे वाटप, शंभर टक्के निकाल लागलेल्या दहावीच्या वर्गातील गुणवंत विद्यार्थीनींचा सत्कार, विविध परिक्षेत यश मिळवणार्‍या संस्थेतील सर्वच विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव, सॅनेटरी नॅपकीन पॅड वेंडींग व डिस्पोजल मशिनचे उद्घाटन या विविध उपक्रमांसोबत यावेळी नवागतांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी बोलताना गरवारे टेक्निकल फायबर्सचे सहाय्यक व्यवस्थापक वैभव जोशी म्हणाले, माझ्या आजपर्यंतच्या वाटचालीचे श्रेय मी आईला देतो. स्त्रीची महिती आणि शक्ती याची जाणीव मला आहे. त्यामुळेच कन्याशाळेत हा उपक्रम राबवत असल्याचा विशेष आनंद आहे. आबासाहेब गरवारे यांची 150 वी जयंती साजरी होत आहे. त्याच दरम्यान हा कार्यक्रम होत असल्याने त्याला विशेष औचित्य लाभले आहे. रमेश गरवारे ट्रस्टने उद्योगापलिकडे जावून सामाजिक भान जपले आहे. विशेषत: शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान देताना ग्रामीण भागातही या सामाजिक उपक्रमाची चळवळ उभारली आहे. ही चळवळ गतिमान करुन विश्‍वामध्ये भारत अग्रभागी व्हावा, यासाठी यापुढेही प्रयत्न केले जातील.
संस्थेचे अध्यक्ष मदन भोसले म्हणाले, वाईच्या औद्योगिक वसाहतीत असलेल्या गरवारे कंपनीचे महत्व आणि या परिसराच्या विकासात असणार्‍या योगदानाची जाणीव आहे. हीच गरवारे कंपनी सामाजिक कार्यात देत असलेले योगदान या जाणीवेला कृतज्ञतेची भावना देणारी आहे. आपल्या परिसरातील बेरोजगार तसेच गरवारे कंपनीवर अवलंबून असणार्‍या लघु उद्योगाच्या माध्यमातून हजारो युवक, महिलांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचे काम गरवारेने केले आहे. त्यामुळे गरवारे कंपनीविषयी नेहमीच विशेष भावना असून त्या भावनेतून गरवारे कंपनी वाढली पाहिजे, यासाठी आपण सदैव सहकार्याच्या भूमिकेत आहोत.
प्रास्तविकात प्राचार्या संगिता शिंदे म्हणाल्या, 1988 साली मदनदादा यांनी ही संस्था स्थापन केली. केवळ शिक्षण न देता सर्वांगिण विद्यार्थी घडवणे, तो परिपूर्ण, उपक्रमशील आणि आदर्श व्यक्तिमत्वाचा असावा, यासाठी दृष्टीने काम करण्याचा आमचा प्रयत्न असतो. त्यामुळे शंभर टक्के निकाल आणि विविध परिक्षांमध्ये अव्वल गुणांनी यश प्राप्त करणारे विद्यार्थी या ठिकाणी घडत आहेत. गरवारे ट्रस्टच्या सहकार्यामुळे या कामाला गती मिळणार आहे. कार्यक्रमास संस्थेच्या कार्याध्यक्षा डॉ. सौ. निलिमा भोसले, डॉ. सौ. सुरभि भोसले-चव्हाण, सरपंच सौ. पुष्पा भोसले, उपसरपंच प्रशांत जाधवराव, गरवारे टेक्नीकल फायबर्स कंपनीचे अधिकारी अंकुश पवार, सुनील पानसे, संजय पिसाळ, उद्योजक मानसिंगराव चव्हाण, वाई नगरपालिकेचे माजी शिक्षण सभापती राजेंद्र खामकर, आर्किटेक्ट श्रीराम कुलकर्णी, किसन वीर कारखान्याचे संचालक नवनाथ केंजळे, शेखर भोसले-पाटील, विजय वाघ, जगन्नाथ दगडे यांच्यासह ग्रामस्थ, पालक उपस्थित होते. संस्थेचे सचिव सुधाकर भोसले यांनी स्वागत तर सुत्रसंचालन सौ. उज्वला शिंदे, पाहुण्यांचा परिचय संस्थेच्या मुख्याध्यापिका सौ. शोभा शिंदे आणि आभार सौ. एस.एस. सावंत यांनी मानले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular