पुसेसावळी: खटाव तालुक्यातील राजाचे कुर्ले येथे शाळेच्या पहिल्याच दिवशी नवागत विदयार्थ्याचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार शाळेच्या पहिल्याच दिवशी विदयार्थाचे स्वागत विविध उपक्रमांनी करण्यात आले. नवीन गणवेश,बूट,पाठीवर दप्तर घेऊन बालगोपाळांनी आई-बाबा, आजी-आजोबा यांचे बोट धरून शाळेचा उंबरा ओलांडला आणि सजलेल्या शाळांचे वर्ग बालकांनी गजबजून गेले होते.
नवागतांचे गुरुजनांनी औक्षण करत गुलाबपुष्प व जिलेबी, पेढे, शैक्षणिक साहित्य देऊन स्वागत केले. शाळेत समारंभपूर्वक विदयार्थ्याच्या हातात पाठ्यपुस्तके पडल्याने चिमुकल्यांच्या चेहर्यावर आनंद झळकत होता.पहिला दिवस असल्यामुळे जिल्हा परिषद शाळा आवारासह वर्गखोल्याही स्वच्छ केल्या होत्या.वर्गखोल्यांच्या उंबर्यावर आंब्याच्या पानांसह झेंडू फुलांची तोरणं आणि वर्गखोल्यांमध्ये पताका लावून सजावट करण्यात आली होती.तसेच रांगोळ्याही काढण्यात आल्या होत्या.गुढी उभारण्यात आली होती.
दरम्यान, पहिल्यांदाच हाती आलेली पाठ्यपुस्तके बघून विद्यार्थ्यांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता.
चिमुकले मोठ्या कुतुहलाने पाठ्यपुस्तके न्याहाळताना दिसून आली. शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व वर्गांमध्ये शिक्षणाला प्रारंभ करण्यात आला.
यावेळी नवागत विद्यार्थी स्वागत प्रसंगी सरपंच समरजितराजे भोसले,मार्केट कमेटी संचालक अनिल माने, मुख्याध्यापिका मनिषा आपटे, मिनाक्षी माने,दिपाली मांडवगडे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष माने, सदस्य, ग्रामस्थ, पालक उपस्थित होते.
शाळेच्या पहिल्याच दिवशी नवागत विद्यार्थ्याचे जल्लोषात स्वागत
RELATED ARTICLES

