Wednesday, December 3, 2025
Homeठळक घडामोडीकिसन वीर कारखाना शेतकर्‍यांच्याविकासाचा केंद्रबिंदू डॉ. संतोष सहाणे;

किसन वीर कारखाना शेतकर्‍यांच्याविकासाचा केंद्रबिंदू डॉ. संतोष सहाणे;

वसंतराव नाईक जयंती संपन्न
भुईंज : साखर कारखाना म्हणजे फक्त साखर निर्मिती नसून त्याला सहप्रकल्पांची जोड दिली तरच शेतकर्‍यांची उन्नती होणार आहे. साखर उत्पादनासह पुरक उद्योग व सभासदहिताचे अनेक विविध प्रकल्प पाहिल्यानंतर मदनदादा भोसले यांच्या नेतृत्वाखालील किसन वीर कारखाना हा केवळ कारखाना नसून विकासाचे एक केंद्रबिंदु आहे, आगामी काळात रासायनिक शेतीचे प्रतिकुल परिणाम लक्षात घेऊन शेतकर्‍यांनी सेंद्रीय शेतीची कास धरावी, असे आवाहन सेंद्रिय शेती तज्ञ डॉ. संतोष सहाणे यांनी व्यक्त केले.
किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्यावतीने स्व. वसंतराव नाईक यांची जयंती व कृषिदिनानिमित्ताने कारखाना कार्यस्थळावरील यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सहाणे बोलत होते. कारखान्याचे उपाध्यक्ष गजानन बाबर, कार्यकारी संचालक अशोकराव जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. सहाणे पुढे म्हणाले, निसर्गचक्रांत मानवाचे स्थान सुक्ष्म स्वरूपात आहे. जोपर्यंत मानवी जीवनाला एखाद्या गोष्टीचे महत्व समजत नाही. तोपर्यंत तो त्याची माहिती घेत नाही. सध्या पडलेला दुष्काळ आपल्यासाठी दिशादर्शक असून गावातील पावसाचे पाणी गावातील जमिनीत मुरले पाहिले, तरच पुढील काळ सुखाचा होण्यास मदत होईल. शेतकर्‍यांनी जमिनीचा पोत सुधारण्यासाठी रासायनिक खतांचा वापर न करता सेंद्रिय खतांचा वापर करावा. यापुढील काळात अभ्यासयुक्त शेती केली तरच शेतीतील उत्पन्न वाढणार आहे. ऊस शेतीबाबतही शेतकरी जागृत झाला पाहिजे. रासायनिक खतांचा वाढत्या वापरंामुळे शेतीचा पोत घसरत आहे तसेच त्यामुळे मातीतील आवश्यक असणारे किटाणू नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. जीवाणुयुक्त खत शेतीला दिल्याशिवाय उत्पन्नात वाढ होणार नाही. यावेळी ऊस शेतीमध्ये बिजप्रक्रिया, जीवाणु प्रक्रियेद्वारे ऊसाची लागवड, ताग व धैंचा, गोपालनाचे फायदे याविषयी प्रदीर्घ मार्गदर्शन उपस्थित शेतकर्‍यांना केले.
प्रास्ताविकात मदनदादा भोसले म्हणाले, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक हरितक्रांती, श्‍वेतक्रांती, शेती व दुग्धक्रांतीचे प्रणेते म्हणून यांनी खर्‍या अर्थाने शेतकर्‍यांना आर्थिकदृष्ट्या संपन्न करण्याचा प्रयत्न केला. शेती आणि शेतकरी हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय होता. शेतकर्‍यांचे जीवनमान उंचविण्याचा प्रामणिक प्रयत्न करणारे महानायक वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस कृषीदिन म्हणून साजरा होत असताना त्यांच्या कार्याचे स्मरण होण्यासाठी कारखाना कार्यस्थळावर दरवर्षी कृषी दिन साजरा करण्यात येतो.
कार्यक्रमानंतर डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला आणि मलकापूर येथील शासनमान्य शैलेश नर्सरीमधुन कार्यक्षेत्रातील शेतकर्‍यांना विक्रीसाठी ना नफा ना तोटा तत्वावर उपलब्ध करण्यात आलेल्या आंबा केशर, रत्ना, हापुस, नारळ बाणवली, प्रताप, ऑरेंज डॉर्फ, सरदार पेरू, बहाडोली जांभुळ, प्रतिष्ठान चिंच, बाळानगर सिताफळ, कालीपत्ती चिक्कु, साई सरबती व सिडलेस लिंबू अशा विविध फळझाड रोप विक्रीचा शुभारंभ डॉ. सहाणे व मान्यवरांच्या हस्ते तानाजी घाडगे, उमेश भोईटे, महेश गायकवाड, गजानन चव्हाण, दत्तात्रय चव्हाण यांना प्रातिनिधीक स्वरूपात करण्यात आला. स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमास सुरुवात झाली. स्वागत व सुत्रसंचालन सौ. शिला जाधव-शिंदे यांनी केले. आभार प्रताप देशमुख यांनी मानले. यावेळी कारखान्याचेवतीने समुह जनता अपघात विम्याच्या धनादेशाचे वाटप सभासदांच्या वारसांना करण्यात आले.
यावेळी कारखान्याचे संचालक चंद्रकांत इंगवले, रतनसिंह शिंदे, नवनाथ केंजळे, राहुल घाडगे, प्रताप यादव-देशमुख, मधुकर शिंदे, सयाजी पिसाळ, चंद्रसेन शिंदे, प्रकाश पवार-पाटील, मधुकर नलवडे, विजय चव्हाण, अरविंद कोरडे, विजया साबळे, कार्यकारी संचालक अशोकराव जाधव, मोहनराव भोसले, युवा नेते केतनदादा भोसले, यशराज भोसले, माजी संचालक नंदाभाऊ जाधव,लालसिंग जमदाडे, शेखर जमदाडे, वाईचे नगरसेवक सतीश वैराट, अहमज इनामदार,धनाजी डेरे, मेघराज भोईटे, शिवाजीराव जाधव, जयवंतराव साबळे, अर्जुन भोसले, अजित जाधव, शंकरराव पवार, शेखर भोसले-पाटील, हरिभाऊ धुमाळ, विविध संस्थांचे पदाधिकारी, शेतकरी, कार्यकर्ते, कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular