Wednesday, December 3, 2025
Homeठळक घडामोडीभारतरत्न, महाराष्ट्र भूषण ने शाहू महाराजांना गौरवावे

भारतरत्न, महाराष्ट्र भूषण ने शाहू महाराजांना गौरवावे

टेंभू योजनेस नागनाथआण्णांचे नांव द्यावे: सादिक खाटीक
म्हसवड : लोकराजा राजर्षि शाहूजी महाराज यांना केंद्राने भारतरत्न, राज्याने महाराष्ट्र भुषण या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरवावे आणि महत्वकांक्षी टेंभू योजनेला क्रांतीवीर नागनाथआण्णा नायकवडी यांचे नांव देण्याचा निर्णय संसद आणि विधीमंडळाच्या चालू अधिवेशनात केला जावा अशी मागणी मुस्लीम खाटीक समाजाचे राज्याचे अध्यक्ष सादिक खाटीक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या खास पत्राद्वारे केली आहे.
छत्रपती राजर्षि शाहूजी महाराज यांच्या जयंतीचे आणि आज आटपाडीत झालेल्या तीन जिल्हयातील 13 दुष्काळी तालुक्यांच्या परिषदेचे औचित्य साधून श्री. सादिक खाटीक यांनी या न्याय मागणीला साद घातली आहे.
आपल्या 28 वर्षाच्या सारे जहाँत प्रिय ठरलेल्या राज्य कारभारात सर्व जाती धर्माच्या मुलामुलींना शिक्षण घेता आले पाहिजे म्हणून शेकडो ठिकाणी शाळया काढल्या, सर्व शिक्षण सक्तीचे व मोफत केले, स्त्री शिक्षणाबाबत कडक कायदा केला, सवर्ण आणि अस्पृश्यांच्या वेगळया शाळा भरविण्याच्या पध्दतीला तिलांजली दिली, आंतरजातीय विवाहांना, विधवा विवाहाला राज्य मान्यता दिली, पुर्नविवाहाला मान्यता देण्याबरोबरच महाराजांचे महाराज म्हणून जगभर गौरविल्या गेलेल्या शाहूजी महाराजांनी शेतक-यांना कर्जे उपलब्ध करुन देणे, शाहू मिल, व्यापारी नगर स्थापन करणे, भारतातले पहिले राधानगरी धरण उभारणे, छत्रपती शिवाजी महारांजाचा जगातला पहिला पुतळा पुण्यात उभारणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षण व चळवळीला मदत, कुस्तीला राजाश्रय, कलावंताना सर्वोतोपरी मदत देण्याचे काम त्यांनी केले, जगात पहिल्यांदा मुस्लीमांना आरक्षण, मुस्लीमांना बोर्डींग, नमाज पठणासाठी मशिदी, त्यासाठीच्या जागा, पैसा, नोक-या, पवित्र कुराण चे मराठी भाषांतर करणेसाठी अनुदान देणा-या शाहुजींनी सर्व धर्मातल्या, जाती जमातींना, प्रचंड सहकार्य केलेच परंतू सर्वच प्रजेवर प्रचंड आणि निखळ प्रेम केले. परधर्म सहिष्णुता आपल्या कृतीतून दाखविण्या-या राजर्षिनी समता, बंधुता, धर्म निरपेक्षेतून आपले राज्य छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणार्‍या रयतेचे राज्य असल्याचे आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.
स्वातंत्र्य प्राप्तीच्या लढयासाठी क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लढा दिलेल्या, अनेकवेळा तुरुंगवास भोगलेल्या क्रांतीवीर नागनाथ आण्णा नायकवाडी यांनी स्वांतत्र्यानंतरही प्रजेला, शेतक-यांना, कष्टक-यांना दीनदलित, उपेक्षीत, वंचितांना खरे स्वातंत्र मिळावे म्हणून आपल्या जीवनाच्या अंतापर्यंत प्रचंड लढा दिला.
राज्यातल्या शंभराहून अधिक दुष्काळी तालुक्यातील करोडो दुष्काळग्रस्तांना न्याय मिळावा म्हणून सांगली, सातारा, सोलापूर जिल्हयातील 13 दुष्काळी तालुक्यासाठींचा पथदर्शक लढा, परिषद त्यांनी या तिन्ही जिल्हयाच्या सरहद्दीवरुन म्हणजे आटपाडीतून सुरु केली. आमच्या सारख्या जमीनीवरील काही कार्यकर्त्यांच्या आग्रहावरुन या लढयाचे आटपाडीतून रणशींग फुंकलेल्या क्रांतीविरांच्या प्रचंड परिषदांच्या धसक्याने त्यावेळी कॉग्रेसचे राज्य जाण्यात आणि अपक्षांच्या समर्थनाने युतीचे राज्य येण्यात परिवर्तन झाले होते. मोठया संख्येने निवडून आलेल्या अपक्ष आमदारांनी टेंभू योजना कार्यान्वीत होण्यासाठी प्रयत्न केल्याने ही योजना युती सरकारने प्रत्यक्षात राबविण्यास सुरुवात केली. तथापी टेंभु योजना शोधणे, सरकारकडे मांडणे, त्यास मान्यता मिळविणारे सरकार दरबारी जरी वेगळे नेते असले तरी हा शोध, गरज आणि निर्णय करण्याच्या मागे क्रांतीविरांच्या आंदोलनचाच छुपा धाक होता हे त्रिवार सत्य आहे आणि म्हणूनच आशिया खंडातल्या सर्वात मोठया योजनेला क्रांतीवीर आण्णांचे नांव देणे हे सर्वमान्य, सर्वस्पर्शी, सर्वप्रिय आणि सर्वोत्तम ठरु शकते.
कठोर बंधने पाळत सामान्य माणसांसारखे, सामान्य माणसांसाठीच जीवन व्यतीत केलेल्या राजर्षि महाराजांसारखेच जीवन, क्रांतीवीर नागनाथ आण्णा नायकवडी यांनी आयुष्यभर जगण्याचे काम केले. जागतिक दर्जाचे कार्य असलेल्या राजर्षि शाहूजी महाराज यांना राज्याने महाराष्ट्र भुषण आणि केंद्र सरकारने भारतरत्न हा सर्वोच्य नागरी सन्मान जाहीर करुन राजर्षिं बरोबर स्वताःच्या सरकारचाही बहुमान करुन घ्यावा. तसेच राज्यातल्या शंभराहून अधिक दुष्काळी तालुक्यासाठी प्रेरक ठरलेला प्रचंड लढा उभारुन त्यासाठी शेवटपर्यंत झुुंजलेले क्रांतीवीर नागनाथआण्णा नायकवडी यांचे नांव टेंभू योजनेस देवून राज्य सरकारने आण्णा बरोबरच स्वतःचा गौरव करुन घ्यावा असेही शेवटी सादिक खाटीक आपल्या पत्रात म्हटले आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular