वडूज: येलमरवाडी (ता.खटाव) येथील शिंगाडे वस्तीवरील ग्रामस्थांनी रस्त्यासाठी येथील तहसिलदार कार्यालयासमोर दोन दिवस बेमुदत उपोषण केले. याप्रकरणी मामलेदार, कोर्ट क्ट 1906 चे कलम 5 प्रमाणे कार्यवाही करू असे लेखी आश्वासन तहसिलदार डॉ. अर्चना पाटील यांनी ग्रामस्थांना दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. याकामी हरणाई सुतगिरणीचे संस्थापक रणजितसिंह देशमुख, माजी सभापती संदिप मांडवे व अन्य पदाधिकार्यांनी समन्वय घडवून आणला.
शिंगाडेवस्तीवर सुमारे 150 लोकांची वस्ती आहे. या वस्तीवर गेल्या 40 वर्षापासून लोक वास्तव्यास आहेत. आजूबाजूच्या लोकांच्या वैयक्तीक शेतातून हे ग्रामस्थ वस्तीवर ये जा करीत होते. मात्र गेल्या चार ते पाच वर्षापासून या वस्तीवर जाणारे एक एक रस्ते बंद करण्यात आल्याने वस्तीवरील ग्रामस्थांची सर्व बाजूने कोंडी झाली आहे. वस्तीवर येण्या जाण्यासाठी सर्व रस्ते बंद झाल्याने संपूर्ण दळण वळण बंद झाले आहे. प्रशासनाने शिंगाडे वस्तीवरील रस्त्याच्या समस्येबाबत तातडीने मार्ग काढण्याची मागणी ग्रामस्थांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला होता.
उपोषणात सरपंच पोपट शिंगाडे, सदस्य रोहिदास शिंगाडे, विश्वनाथ शिंगाडे, तानाजी शिंगाडे, महादेव शिंगाडे, दिलीप शिंगाडे, राजेंद्र शिंगाडे, मधुकर शिंगाडे, पांडूरंग शिंगाडे, दिनकर शिंगाडे, आकाराम शिंगाडे, मस्कू शिंगाडे, किसन शिंगाडे, सुनिल शिंगाडे, लक्ष्मण शिंगाडे, विलास शिंगाडे, माजी सरपंच अलका शिंगाडे, अरूणा शिंगाडे, लिलाबाई शिंगाडे, योगिता शिंगाडे आदी सहभागी झाले होते. श्री. देशमुख, श्री. मांडवे, धनंजय क्षीरसागर यांच्या हस्ते सरबत पिऊन उपोषण सोडण्यात आले. यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते राजूभाई मुलाणी, माजी सरपंच शरद बागल, प्रसाद बागल, सदाशिव बागल आदी उपस्थित होते.
तहसिलदारांच्या आश्वासनानंतर येलमरवाडीकरांचे आंदोलन मागे
RELATED ARTICLES

