Thursday, November 6, 2025
Homeठळक घडामोडीडॉल्बी वाजवल्यास कारवाई होणारच; पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांचा इशारा

डॉल्बी वाजवल्यास कारवाई होणारच; पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांचा इशारा

फलटण: गणेश विसर्जनावेळी डॉल्बी लावणार्‍या मंडळांची ध्वनिक्षेपक यंत्रणा तत्काळ जप्त केली जाईल तसेच संबंधितांवर गुन्हे दाखल होऊन कारावास आणि दंडही होऊ शकतो. डॉल्बी वाजवल्यास कारवाई होणारच इशारा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिला आहे.
फलटण येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय येथे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी गणेशोत्सव मंडळाची बैठक आयोजित केली होती. पोलिसांनी गेल्या महिन्याभरापासून गणेश मंडळ, डॉल्बीमालक आणि चालकांचे डॉल्बीमुक्तीसाठी वेळोवेळी बैठका घेऊन सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. अनेक गणेशोत्सव मंडळ डॉल्बी वाजवण्याची शक्यता गृहीत धरून जिल्हा पोलीस प्रमुखांनी कडक कारवाई करण्याचा इशारा दिल्याने विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी वाजू नये, यासाठी मिरवणुकीआधीच विसर्जन मार्गावर पोलीस बंदोबस्त तैनात राहणार आहे.
डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जिल्ह्यातील संपूर्ण पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून गणेश विसर्जन मिरवणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणरायाचे आगमन झाल्यावर सार्वजनिक मंडळांच्या गणेशाचे विसर्जन डॉल्बीमुक्त वातावरणात व्हावे, असा पोलिसांचा निर्धार आहे त्याअनुषंगाने फलटण पोलिसांकडे ध्वनिमापक यंत्रे देण्यात आली असून ध्वनिमापक यंत्रांचा वापर करणार्‍या पोलिसांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. डॉल्बी यंत्रणा वाजवणार्‍या मंडळांवर तत्काळ जप्तीची कारवाई होईल तसेच आवाज मर्यादेचे उल्लंघन झाल्यास डॉल्बीचालक व संबंधित मंडळांवर ध्वनिप्रदूषण कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल गुन्हे दाखल केले जातील. या अंतर्गत दोषींना सश्रम कारावास होऊ शकतो. मंडळांनी आवाज मर्यादा पाळावी अन्यथा कारवाई अटळ आहे असे तेजस्वी सातपुते, पोलीस अधीक्षक यांनी सांगितले.
मिरवणुकीच्या मुख्य मार्गावर सर्व प्रकारच्या गाड्यांना पार्किंग बंदी घालण्यात आली आहे. तसेच नाना पाटील चौकातून पंढरपूर कडे जाणार्‍या व येणार्‍या गाड्यांची वाहतूक सोमवार पेठ मधील बाह्य वळणाच्या दिशेने वळवण्यात येणार आहे. मिरवणुकीच्या मार्गावरील धोकादायक व अडथळा निर्माण करणार्‍या झाडाच्या फांद्या तोडण्याच्या सूचना देण्यात आल्या असून रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्याचे काम सुरू आहे. विविध ठिकाणी सूचना फलक लावण्यात आले आहेत तसेच गणपती विसर्जन ठिकाणी क्रेन ठेवण्यात आली असून सुरक्षितत्यासाठी लाईफगार्ड नेमण्यात आले आहेत. आवश्यक ठिकाणी विद्युत दिवे लावण्यात आले आहेत असे यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी सांगितले. यावेळी पोलीस निरीक्षक प्रताप पोमन, पोलीस निरीक्षक सावंत तसेच गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फलटण शहरात गणपतीच्या आगमनाला व विसर्जन मिरवणुकीत एक बेस दोन बेसच्या नावाखाली डॉल्बीचा वाजवला जातो.मात्र यावर्षी एसपींच्या कारवाई करण्याच्या इशारा देऊनही विसर्जन मिरवणुकीत डॉल्बीचा दणदणाट करणार्‍या मंडळाच्यावर खरंच कारवाई होणार का?

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular