कराड: समाजातील दुर्बल, शोषित, पिडीत, दिव्यांग, वृद्ध, निराधार, विधवा, परितक्ता, घटस्फोटिता तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकांच्या कल्याणासाठी भाजपा सरकार प्रयत्नशील असून, सरकार या घटकांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे प्रतिपादन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष ना. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी केले. संजय गांधी निराधार योजनेच्या अनुदान वाढ पत्रांचे वितरण ना. भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
समाजातील निराधार जनतेसाठी वरदान ठरणार्या संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेच्या अनुदानात भरीव वाढ करावी, अशी मागणी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष ना. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी शासनस्तरावर केली होती. या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेच्या अनुदानात 600 रुपयांवरुन 1000 रु. इतकी भरघोस वाढ केली आहे. तसेच एक अपत्य असणार्या लाभार्थ्यांना 1100 रु. आणि दोन अपत्ये असणार्या लाभार्थ्यांना 1200 रु. इतकी वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे सर्वसामान्य जनतेला मोठा आधार मिळाला आहे. ही वाढ दि. 1 सप्टेंबर 2019 पासून लागू झाली असून, कराड तालुक्यातील 8900 लाभार्थ्यांना याचा लाभ होणार आहे.
या लाभार्थ्यांना अनुदान वाढ पत्राचे वितरण ना. डॉ. भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी भाजपा सरकारने हा निर्णय घेऊन सर्वसामान्यांचे अश्रू पुसण्याचे काम केले आहे. भविष्यात वंचित घटकातील कोणीही सदस्य शासकीय योजनांपासून दुर्लक्षित राहणार याची काळजी घेत, भाजपा कार्यकर्त्यांनी शासकीय योजनांचा लाभ तळागागळापर्यंत पोहचवावा, असे आवाहन केले.
संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष संजय पवार यांनी अनुदानात वाढ केल्याबद्दल भाजपा सरकारचे आभार मानून, लवकरच हे वाढीव अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वर्ग केले जाणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी अनुदानवाढीसाठी पाठपुरावा केल्याबद्दल लाभार्थ्यांच्यावतीने ना. डॉ. अतुलबाबा भोसले यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी भाजपा दिव्यांग आघाडीचे जिल्हाध्यक्ष शरद साळुंखे, कराड दक्षिण दिव्यांग आघाडीचे अध्यक्ष विकास थोरात यांच्यासह महिला लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
निराधार घटकांच्या पाठीशी भाजपा सरकार ठामपणे उभे: ना.डॉ. अतुलबाबा भोसले
RELATED ARTICLES

