Tuesday, December 2, 2025
Homeठळक घडामोडीपवार साहेबांना राजकारणातून संपवणारा जन्माला यायचा आहे : शशिकांत शिंदे

पवार साहेबांना राजकारणातून संपवणारा जन्माला यायचा आहे : शशिकांत शिंदे

सातारा : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना देशात, आणि राज्यात राजकारणाचा चार दशकाचा अनुभव आहे. पवार साहेबांना राजकारणातून संपवण्याची भाषा विरोधक करतात मात्र पवारांना संपवणारा जन्माला यायचा आहे असा जोरदार घणाघात राष्ट्रवादीचे पक्षप्रतोद आमदार शशिकांत शिंदे यांनी केला. दरम्यान निवडणुका आल्यामुळे अनेकांवर कारवायांची भिती दाखवून त्यांच्यावर दबाव आणला जात असून मर्दासारखे लढा, रडीचा डाव कशासाठी? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार रविवार (दि. 22) रोजी सातारा जिल्हा दौर्‍यावर येत असून त्यादृष्टीने नियोजन करण्यासाठी राष्ट्रवादीभवनात आयोजित बैठकीत आमदार शिंदे बोलत होते. यावेळी आमदार बाळसाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने, सारंग पाटील, मानसिंगराव जगदाळे, देवराज पाटील, भारती शेवाळे, शिवाजी सर्वगौड, सुरेंद्र गुदगे, कविता म्हैत्रे, बाळासाहेब सोळस्कर, संजयनाना साळुंखे, शशिकांत पिसाळ, सतीश चव्हाण, किरण साबळे -पाटील, सम्रिंद्रा जाधव, जयश्री पाटील, राजाभाऊ पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
आ. शिंदे पुढे म्हणाले, गेली पाच वर्षे ज्यांनी सरकारवर आरोप केले तीच मंडळे भाजपाने पक्षात घेवून त्यांना पवित्र करण्याचे काम केले आहे. विरोधकांनी मर्दासारखे लढण्याची गरज असून रडीचा डाव आता बंद करावा. आमचे श्रध्दास्थान असलेल्या शरद पवारांना टार्गेट करण्यात येत असल्याने कार्यकर्ते पेटून उठले असून ते निश्चितच परिवर्तन करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आ. शिंदे पुढे म्हणाले, गेली 25 वर्षे सत्तेत असताना ज्यांना पवार साहेब दैवत वाटत होते, ती मंडळी आज सोडून जात आहेत. पिचडांना काम कमी केले होते म्हणून ते गेले. उद्या मला काय मिळेल यापेक्षा मी शरद पवारांच्या जवळचा कार्यकर्ता आहे याचे मी भाग्य समजतो. ज्यांनी आयुष्यातील कित्येक वर्षे या महाराष्ट्रासाठी योगदान दिले त्यांच्याबद्दल बोलण्याचा विरोधकांना अधिकार नाही. सत्ता गेली म्हणून सत्तेमध्ये जाणारे बघितल्यावर साहेबांच्या मनातही खंत आहे. मात्र कार्यकर्त्यांनी खचून न जाता उद्याचा महाराष्ट्र ही राष्ट्रवादी घडवणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
शरद पवारांनी राज्यात सुरु केलेल्या दौर्‍याला मिळत असलेला प्रतिसाद पाहून विरोधकांना धडकी भरली असल्याने राष्ट्रवादीला टार्गेट करण्यात येत आहे. मात्र राष्ट्रवादी राज्यात भक्कम असून सातारा जिल्हा हा बालेकिल्ला राहीलच, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. परिणामांचा विचार न करता सर्वांनी प्रामाणिक काम केले तर निश्चित मोठे यश मिळणार नाही. आजच्या बैठकीची उपस्थिती पाहिल्यावर उर्जा मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे जिल्ह्यातील तळागाळातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी दि. 22 रोजी पवार साहेबांच्या जंगी स्वागतासाठी सातार्‍यात उपस्थित राहावे, असे आवाहन आ. शिंदे यांनी केले.
आमदार बाळासाहेब पाटील म्हणाले, राष्ट्रवादीचा विचार संपवणे एवढे सोपे काम नाही. दि. 22 रोजी मोठे शक्तीप्रदर्शन करुन विरोधकांना राष्ट्रवादीची ताकद दाखवून द्या. सुनील माने म्हणाले, पक्षात कोण आले आणि कोण गेले याचा पक्षावर परिणाम होणार नाही. पक्ष जिल्ह्यात मजबूत असून कार्यकर्ते पक्षाबरोबरच आहेत. पवार साहेबांनी घडवलेले अनेक कार्यकर्ते आजही पक्षासाठी झोकून देवून काम करत आहेत. प्रत्येकाने मी उमेदवार आहे, असे समजून लढा. सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असल्यासारखे स्वागत करा. निवडणुकीपुरते लोकशाहीतील राजे, असे जनतेला काहीजण म्हणतात मात्र निवडणुका संपल्या की त्यांना विसरुन जातात, अशा शब्दात माने यांनी उदयनराजेंवर नाव न घेता टीका केली.
सचिन कदम म्हणाले, 18 गावातील जनता ही राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच राहणार आहे. रविवारी मोठे शक्तीप्रदर्शन करण्यात येणार असून त्यामध्ये 18 गावांचा मोठा सहभाग असेल.
बाळासाहेब सोळस्कर म्हणाले, उत्तर कोरेगाव हा पहिल्यापासून राष्ट्रवादीबरोबर राहिला आहे. पवार साहेबांना कुठेही कमीपणा येईल, असे काम होणार नाही. शशिकांत पिसाळ म्हणाले, कोण कुठे गेले तरी पक्षाची ताकद कमी होणार नाही. आमच्या डोक्यावर पाय ठेवून साहेबांनी जी माणसे मोठी केली तीच आज त्यांना सोडून गेली. असे असले तरी राष्ट्रवादी चांगल्या पध्दतीने स्वच्छ झाली आहे. बालेकिल्ला ढासळला असे लोक म्हणत असले तरी ते चुकीचे आहे. काही लोक गेले असले तरी कार्यकर्ते पक्षाबरोबरच आहेत.
देवराज पाटील म्हणाले, पवार साहेबांचा रविवारचा दौरा यशस्वी करण्यासाठी कराड तालुक्यातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सातार्‍यात येणार आहेत. राष्ट्रवादीचा विचार संपवणे सोपे नसून पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी खचून न जाता पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावेत. राजेंद्र लवंगारे यांनी प्रास्ताविक केले. राजकुमार पाटील यांनी आभार मानले.
जनतेचा करंट सहन होणार नाही
मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा ज्या मार्गावरुन येणार होती त्या मार्गावरील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. करंट लागेल अशी भिती होती. मात्र विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनता त्यांना बसवणारा करंट हा सहन होणार नाही, अशा शब्दात आ. शशिकांत शिंदे यांनी भाजपावर निशाना साधला.
माझ्या बदनामीचे राजकारण : आ. शिंदे
गेल्या पाच वर्षापूर्वी झालेल्या तक्रारीचे तुणतुणे वाजवून आम्हाला घाबरवण्याचे काम करण्यात येत आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज हे नियमाप्रमाणेच चालत असल्याबाबत त्याचवेळी विषय संपला आहे. मात्र जाणीवपूर्वक बदनामी करण्याच्या हेतून काही जण माझी वैयक्तिक बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत. माझी कुठलीही चौकशी लागू द्या मी घाबरणारा नाही. मी अटकेला घाबरत नसून मी शशिकांत शिंदे आहे, आहे शब्दात त्यांनी टीका केली.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular