उदयनराजे भोसले यांची श्रीनिवास पाटील, पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका
कराड: मला नीट बोलता येत नाही, अशी टीका माझ्यावर करणार्यांना मी एकच सांगू शकतो की मी तुमच्यापेक्षा वयाने लहान आहे, माझे तुमच्यापेक्षा शिक्षण कमी आहे, तुमच्यापेक्षा मला अनुभवही कमी आहे, मात्र मी तुमच्यासारखा खोटा बोलत नाही. तुम्ही ऐन उमेदीत असताना कराड, सातार्याचा काय विकास साधला ते आता साधणार आहात? अशा शब्दात श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले. दरम्यान, आपणावर टीका करणार्यांनी कधीही एका व्यासपीठावर येवून बोलावे, असे आवाहनही उदयनराजे यांनी दिले.
विंग ता. कराड येथे भाजपा व मित्रपक्षाचे लोकसभा पोटनिवडणुकीतील उमेदवार श्री. छ. उदयनराजे भोसले व कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील उमेदवार डॉ. अतुल भोसले यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. भर पावसात हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात उदयनराजे बोलत होते. यावेळी डॉ. अतुल भोसले, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, ऍड. भरत पाटील, राजेंद्रसिंह यादव, विजयसिंह यादव यांच्यासह भाजप, शिवसेना, रिपाई व मित्रपक्षांचे पदाधिकारी, कार्येकर्ते उपस्थित होते.
या जाहीर प्रचारसभेत उदयनराजे भोसले पुढे म्हणाले, जनता हेच सर्वस्व मानून आम्ही विकासकामे केली आहे. तुम्ही आहे म्हणून आम्ही आहोत. लोकांवर अन्याय होत असेल तर तो मी कधीही सहन करत नाही. मी एकतर कुणावर टीका करत नाही; तरीही जाणीवपूर्वक माझ्यावर टीका करण्यात येत आहे. तुम्ही वडीलधारी मंडळी आहात, तुमचे शिक्षण व अनुभव जास्त आहे मात्र तुमच्यासारखा मी खोटा बोलत नाही. तुम्हाला जशी सत्ता आणि पदाची लालसा आहे तशी आम्हीला कधीच नव्हती आणि नसणार आहे. मी जोपर्यंत जिवात जीव आहे तोपर्यंत तुमच्यासाठीच झिजणार आहे.
उदयनराजे पुढे म्हणाले, जी मंडळी आज आमच्यावर टीका करत आहेत ती मंडळी मोठ्या पदावर कार्यरत होती. खासदारकी, पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्रीपद, अगदी राज्याचे मुख्यमंत्रीपदही त्यांच्याकडे होते. तर काहींकडे खासदारकी, राज्यपालपद होते त्यामुळे निदान कराड शहराचा तरी त्यांच्या माध्यमातून चांगला विकास झाला असेल असे वाटत होते. मात्र त्यांनी केवळ लोकांची फसवणूक करुन पदे मिळवली व नंतर यांना लोकांचा विसर पडला आहे. अहो विकास करायला इच्छाशक्ती लागते आणि ती तुमच्यामध्ये नाही. त्यामुळे आज जनता तुम्हाला त्याचा जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. मी आत्तापर्यंत सुमारे 15 हजार कोटींची कामे केली आहेत.
मतदारसंघातील जनतेच्या प्रश्नांची मला जाण आहे. मी कायम तुमच्यात असतो तसे काही मंडळी फक्त निवडणूक आहे म्हणून येत आहेत त्यांना या निवडणुकीत त्यांची जागा दाखवा. विकासाच्या मुद्यावर आपण कधीही समोरासमोर चर्चेस तयार असून पृथ्वीराजबाबा आणि श्रीनिवास पाटील यांनी कधीही एका व्यासपीठावर चर्चेसाठी यावे, असे आव्हानही त्यांनी केले. यावेळी श्रीनिवास पाटील यांचे नाव न घेता उदयनराजेंनी त्यांच्यावर मार्मिक टीका केली. डॉ. अतुल भोसले यांनी या मतदारसंघाचा चांगला विकास साधला असून भाजपच्या माध्यमातून अनेक कामे मार्गी लावली आहेत. त्यामुळे त्यांना मोठ्या मताधिक्क्याने विजयी करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
डॉ. अतुल भोसले म्हणाले, कराड दक्षिण मतदारसंघात केलेली विकासकामे आणि जनतेचा मिळत असलेला प्रतिसाद यामुळे विरोधकांची धाकधूक वाढली आहे. त्यामुळे पुढच्या चार दिवसात तुम्हाला भावनिक आवाहन करण्यात येईल, ही आमची शेवटचीच निवडणूक आहे, असेही सांगितले जाईल. मात्र मतदारांनी त्यांच्या फसवेगिरीला आणि गोड गोड बोलण्याला बळी न पडता मतदारसंघाच्या विकासासाठी श्री. छ. उदयनराजे व आम्हाला साथ द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. कराड दक्षिनमधून उदयनराजेंचा मोठूे मताधिक्य देण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकरांसह मान्यवरांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेवून उदयनराजे भोसले व अतुल भोसले यांना मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले.
उमेदीत असताना काय विकास केला ते आता करणार?
RELATED ARTICLES

