महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे रहा; मुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहन
फलटण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सशक्त भारताची निर्मिती होत आहे. मोदी यांचे नेतृत्व वैश्विक होत असून तिरंग्याची शान वाढविणारे व एकसंघ भारत तयार करण्याच काम त्यांच्या नेतृत्वाखाली होत आहे. आगामी काळात दुष्काळ मुक्त महाराष्ट्र घडविणे हे आमचे ध्येय असून या ध्येयपुर्तीसाठी महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
फलटण येथे आयोजित करण्यात आलेल्या महाजनादेश संकल्प सभेत ते बोलत होते. यावेळी खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर, माजी खासदार रणजीतसिंह मोहिते-पाटील, माजी आमदार जयकुमार गोरे, दिगंबर आगवणे, विश्वासराव भोसले, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव, डॉ. जिजामाला नाईक निंबाळकर, डॉ. नरसिंह निकम, जयश्री आगवणे आदी मान्यवरांची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती.
फलटणकरांनी लोकसभा निवडणूकीत खासदार रणजीतसिंह यांच्या माध्यमातून एक इंजिन भाजपाला येथील जनतेने दिले तर विकासात्मक कामांची रेल्वे किती जोरात धावतेय हे फलटणकरांनी अनुभवलेय, आता याच्या जोडीस आमदारकीच्या माध्यमातून दुसरं इंजिन दिलं तर विकासाची गाडी किती जोरात धावेल याचा विचार करा, एक इंजिन दिल्लीच व दुसरं इंजिन राज्याचं असेल तर त्यांना विकास निधीचं इंधन आम्ही कदापी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही देत फलटणच्या जनतेने 24 तारखेस फलटणचा आमदार आमच्या झोळीत टाकावा असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.
फलटण तालुक्यातील महत्वपुर्ण असणार्या व येथील शेतकर्यांचे हक्काचे नीरा-देवघरचे पाणी आमच्या सरकारने पुन्हा मिळवून दिले, वर्षानुवर्षे रखडलेला रेल्वे प्रश्न सोडविलाच नाही तर प्रत्यक्षात ती धावायलाही लागली, नाईकबोंबवाडी येथील नविन एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लावला. त्याचबरोबर या तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकर्यांच्या दृष्टीने महत्वपुर्ण असणार्या न्यू फलटण शुगर वर्क्स या साखरवाडी येथील कारखान्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्यशासन या शेतकर्यांच्या पाठीशी ठामपणे राहील अशी ग्वाहीही फडणवीस यांनी यावेळी दिली. जात, पंथ, धर्म व जातीपातीचे राजकारण करु नका, समाजातील प्रत्येक घटकाच्या विकासासाठी प्रयत्नशील रहा असे मोदींनी सांगितले आहे, त्यानुसारच आमची वाटचाल राहिली असल्याचे स्पष्ट करुन फडणवीस म्हणाले 2019 च्या अखेर पर्यंत राज्यात एकही बेघर राहणार नाही हे आमचे ध्येय असून ती ध्येय पुर्ती आम्ही निश्चितपणे करणार आहोत. ज्यांना घरे बांधण्यासाठी जागा नाहित त्यांच्या जागेचा प्रश्नही आम्ही सोडविला असून शासकीय जागेत अतिक्रमण केलेल्या लोकांना घरे मिळावित यासाठी कायद्यात बदल करुन त्यांनाही घरे देण्याचा आमचा प्रयत्न राहणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवर्जुन सांगितले.
आगामी काळात दुष्काळ मुक्त महाराष्ट्र घडविणे हे आमचे ध्येय
RELATED ARTICLES