Thursday, October 16, 2025
Homeठळक घडामोडीशरद पवार, पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्रासाठी काय केले?

शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्रासाठी काय केले?

ना. अमित शहा : उदयनराजे आमच्याबरोबर याचा सर्वात मोठा आनंद, अतुलबाबांना राज्याचा नेता बनवणार
कराड : शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण कित्येक वर्षे सत्तेत होते, त्यांनी केवळ सत्ता, पदे भोगली त्यांनी महाराष्ट्रासाठी काय केले? असा सवाल भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. दरम्यान छत्रपती शिवरायांचे वंशज श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आमच्याबरोबर आल्याचा सगळ्यात मोठा आनंद असून अतुल भोसले यांना आमदार करा राज्याचा नेते मी करतो, असे प्रतिपादन शहा यांनी केले.
सातारा लोकसभा निवडणुकीतील भाजप आणि मित्र पक्षाचे उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ.अतुल भोसले यांच्या प्रचारार्थ कराड येथील शिवाजी स्टेडियमवर आयोजित जाहीर सभेत नामदार अमित शहा बोलत होते. व्यासपीठावर श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, डॉ. अतुल भोसले, शेखर चरेगावकर, मदनराव मोहिते, डॉ. सुरेश भोसले, नीता केळकर, भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, नगराध्यक्ष रोहिणी शिंदे, राजेंद्रसिंग यादव, अ‍ॅड. भरत पाटील, सुनील पाटील, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, विनायक भोसले, उत्तरा भोसले, गौरवी भोसले, आर. टी. स्वामी, राजाभाऊ देशपांडे, मोहन जाधव,विनायक पावसकर, विद्या पावसकर, मकरंद देशपांडे आदी उपस्थित होते.
ना. अमित शहा पुढे म्हणाले, श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नेहमीच जनता हे सर्वस्व मानून काम केले आहे. छत्रपती शिवरायांच्या गादीबद्दल देशवाशियांना नेहमीच अभिमान आहे. छत्रपतींच्या विचारावर चालणारे आम्ही आहे. राष्ट्रवादीने काश्मीरमधील 370 कलम हटवायला विरोध दर्शवल्याने पावणे तीन महिन्यात खासदारकीचा राजीनामा दिला. ज्यावेळेस उदयनराजेंनी भाजपात प्रवेश घेण्याचे निश्चित केले त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांचा मला फोन झाल्यानंतर माझ्या उपस्थितीत दिल्लीत प्रवेश घेतो असे त्यांना सांगितले त्यानुसार मोठ्या उत्साहात उदयनराजेंचे भाजपात स्वागत करण्यात आले. उदयनराजे भोसले यांना मोठा जनाधार असून त्यांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. मी स्वत: एका बुथचा अध्यक्ष म्हणून काम केले आहे त्यामुळे अतुल भोसले आपण काळजी करु नका तुम्ही कार्यकर्ते म्हणून काम करत असला तरी येथील जनता तुम्हाला निश्चित आमदार करणार असून मी ग्वाही देतो की तुम्हाला राज्याचा नेता बनवतो, असेही अमित शहा म्हणाले.
अमित शहा पुढे म्हणाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे सुमारे 50 वर्षे सत्ता होती मात्र त्यांना जनतेला केवळ झुलवत ठेवण्याचे काम केले. स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या नावाचा काँग्रेसने वापर केला मात्र त्यांचा सन्मान केला नाही. शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी अनेक मोठी पदे मिळवली मात्र त्यांनी महाराष्ट्रासाठी काय केले? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या निवडणुकीत दोन्ही काँग्रेसचा पूर्ण सफाया होणार असून पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री बनतील, असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला. काँग्रेस – राष्ट्रवादीच्या कार्यकाळात झालेल्या आदर्श घोटाळ्यात शहीदांच्या कुटुंबियांचे फ्लॅट बळकावण्याचे प्रकार झाले. भ्रष्ट्राचाराचे अनेक प्रकार यांच्या कार्यकाळात झाले मात्र भाजपने पारदर्शकता आणून स्वच्छ कारभाराला प्राधान्य दिले. काश्मीरमधील 370 कलम हटवून सुरक्षितता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तरी देखील शरद पवार म्हणताहेत 370 कलमाचा आणि महाराष्ट्राचा काय संबंध त्यांनी 370 कलम हटवण्यास विरोध केला होता त्यामुळे जनतेने त्यांना जाब विचारण्याची गरज आहे. 2024 पर्यंत एनआरसी अंतर्गत घुसखोरांना बाहेर काढणार आहे.
देशात आणि राज्यात भाजपच भक्कम सरकार देणार असून केंद्राच्या माध्यमातून राज्यातील अनेक महत्वकांक्षी प्रकल्प मार्गी लागले असून आगामी काळातही महाराष्ट्रावर, सातारा जिल्ह्यावर दुर्लक्ष होणार नाही. श्रीमंत छत्रपती उदयनराजेंनी अनेक प्रश्न सांगितले असून त्याची पूर्तता केली जाईल, असेही अमित शहा म्हणाले.
उदयनराजे भोसले म्हणाले, सातारा जिल्ह्याला सैनिक परंपरा लाभली असून या जिल्ह्यातील अनेक सुपुत्र देशाचे रक्षण करताना शहीद झाले आहेत. काश्मीरमधील 370 कलम रद्द केल्याने सीमेवर शांतता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी देशातील 125 कोटी जनतेच्या संरक्षणाची जबाबदारी घेतली आहे. आमच्याशी जसे वागाला तसेच आम्ही वागू या शब्दात त्यांनी शेजारच्या देशांना इशारा दिला आहे. त्यामुळे 370 चा महाराष्ट्राशी काय संबंध असे म्हणणार्‍यांनी विचार करण्याची गरज आहे. महाराष्ट्रातील स्ट्राँग मॅन म्हणून ओखळ असणार्‍यांनी मराठा समाजाला इतक्या वर्षे झुलवत ठेवले मात्र भाजपा सरकारने मराठा समाजाला आरक्षण देवून अनेक प्रश्न मार्गी लावल्याचे ते म्हणाले.
पश्चिम महाराष्ट्र हा काँग्रेसला बालेकिल्ला होता मग निदान या भागाचा तरी त्यानी विकास करणे गरजेचे होते. मात्र मतापुरते लोकांना वापरायचे आणि नंतर त्यांना वार्‍यावर सोडून द्यायचे अशा प्रकारची वागणूक काँग्रेसकडून जनतेला मिळाली आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल जनतेत प्रचंड चीड असून राज्यात भाजप व मित्रपक्षांचेच सरकार येईल. आचारसंहिता संपल्यानंतर अतिवृष्टीग्रस्त, पूरग्रस्तांना केंद्र आणि राज्य सरकारकडून भरीव मदत करण्यात येणार आहे, असेही उदयनराजे म्हणाले.
डॉ. अतुल भोसले म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या माध्यमातून देशभरातील सर्व जाती धर्माच्या लोकांना सुरक्षित वातावरण तयार करण्यात आले आहे. 370 कलम हटवल्यानंतर काश्मीरमधील हिंसाचार थांबला आहे. आम्ही भाजपाचे कार्यकर्ते म्हणूनच काम करत असून जनसेवेसाठी कधीही कमी पडणार नाही. पंढरपूर देवस्थान समितीच्यावतीने विविध कल्याणकारी उपक्रम राबवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी डॉ. भोसले यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली.
दरम्यान, प्रारंभी उदयनराजे भोसले यांच्यावतीने चांदीची तलवार, शाही पगडी देवून ना. अमित शहा यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. अतुल भोसले, विक्रम पावसकर यांच्यावतीनेही सत्कार करण्यात आला. या सभेस भाजप, शिवसेना, रिपाई, मित्र पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular