औंध (वार्ताहर):- औंध गावासाठी वरदान ठरणाऱ्या येळीव तलावातील पाणी साठयात बेकायदेशीरपणे सुमारे शंभरच्या वर मोटारी टाकून येळीवसह परिसरातील चार ते पाच गावातील शेतकऱ्यांकडून बिनबोभाट पाणी उपसा सुरू असून संबंधित पाटबंधारे ,महसूल तसेच वीज वितरण कंपनी याबाबत मूगगिळून गप्प असून यामुळे येळीव तलावातील पाणी मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे व औंध गावाला पाणी पुरवठा करणारा जँकवेल उघडा पडला आहे. त्यामुळे औंध गावाला पाणी टंचाई भेडसावू लागली आहे.
त्यामुळे तातडीने याबाबत कारवाई करण्याची मागणी औंधचे उपसरपंच दिपक नलवडे यांनी प्रशासनाकडे केली असून पाटबंधारे विभागाने येळीव तलावात त्वरित पाणी सोडावे अशी ही मागणी दिपक नलवडे व ग्रामपंचायत सदस्यांनी लेखी पत्राद्वारे संबंधितांकडे केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी ,औधची सुमारे आठ ते दहा हजार लोकसंख्या आहे. औंधसह परिसरात गोटेवाडी वस्ती, माने वस्ती,पोलीस वसाहत तसेच अन्य तीन ते चार वस्त्या आहेत. यासर्व परिसरास औंध गावासह नळाद्वारे पाणी पुरवठा केला जातो.
औंध गावात सुमारे बाराशेच्यावर नळकनेक्शन आहेत. त्यामुळे नियमित सुमारे चार लाख लिटर पाण्याची औंधला गरज आहे .यामध्ये जगप्रसिद्ध वस्तू संग्रहालय तसेच मूळपीठ डोंगरावर येणाऱ्या भाविक ,पर्यटकांना ही मोठया प्रमाणात पाण्याची गरज असते.
हा सर्व पाणी पुरवठा येळीव येथील तलावातून होतो मात्र काही मोजकेच परवानाधारक शेतकरी सोडले तर अनेक शेतकरी बेकायदेशीर पणे येळीव तलावातून पाणी उपसा करत आहेत. परवानाधारक शेतकर्यांना फेब्रुवारी अखेर पाणी उपसा करण्याची परवानगी आहे मात्र तरीही मार्च ,एप्रिल महिन्यामध्ये ही सुमारे 100ते 125शेतकरी बेकायदेशीर पणे येळीव तलावातील पाणी उपसा करत आहेत असे दिसून आले आहे.
याचा परिणाम मोठ्या प्रमाणात येळीव तलावातील पाणी साठयात घट झाली आहे त्याच्या झळा औंधकरांना पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत.
याबाबत प्रशासनाने त्वरित कारवाई करून पाणी उपसा करणार्या बेकायदेशीर मोटारी, पाईप्स व अन्य साहित्य जप्त करावे अशी मागणी केली जात असून प्रशासनाच्या मनमानी बेफिकीर कारभाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

