पाटण- नुकत्याच झालेल्या बाजार समितीच्या विजयी मिरवणुकीत वाड्यासमोर आल्यानंतर शंभुराज देसाई यांनी शड्डू ठोखला. आपली तब्येत काय.. आपण करताय काय.. जणू सगळ्या मंत्र्यांचा मक्ता यांना दिला आहे. बघल तवा टि.व्हीच्या माईक पुढे.. पुढे पुढे करत जरा काय झाल की भू..भू..भू.. करण्याची सवय लागली आहे. आतातर पाटण मतदार संघात सायरन चा आवाज ऐकू आला की शंबड पोरग पण म्हणतय पन्नास खोके.. एकदम ओके. माग पुढे अधिकाऱ्यांच्या गाड्यांचा ताफा लावून जनतेच्या पैस्याची उधळपट्टी करण्याचा उध्दोग या मंत्र्यांनी सुरु केला आहे. राज्यात भ्रष्टाचारवर भ्रष्टाचार वाढत चालला आहे. सत्तेचा गर्व चढलेल्या अशा मंत्र्यांना विधानसभा निवडणुकीत घरी बसवा.. असे आवाहन विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी तळमावले (गुढे) ता. पाटण येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना केले.
यावेळी माजी बांधकाम मंत्री विक्रमसिंह पाटणकर होते. खा. श्रीनिवास पाटील, माजी पालकमंत्री आ. बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादीचे तालुक्याचे नेते सत्यजितसिंह पाटणकर, राष्ट्रवादी आय.टी.सेलचे प्रदेश अध्यक्ष सारंग पाटील, राजेश पाटील वाठारकर, सुभाषराव शिंदे, मानसिंगराव जगदाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
ना. अजितदादा पवार म्हणाले शिंदे-फडणवीस सरकार हे शेतकरी कामगार यांच्या विरोधातील सरकार आहे. देश पातळीवरील सरकार पाहिजे तसे काम करत नाही. या सरकारच्या वर्षभरात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. देशात दंगली वाढल्या, भ्रष्टाचार बोकाळला, महागाई वाढलाय? समाजात, दुही, अंतर पाडण्याचे काम सरकार करतंय. पुढील निवडणुकीत आपण जो उमेदवार देवू त्याचे कार्यकर्त्यांनी इमाने इतबारे काम करावे. आपल्यातच आडवा-आडवी, पाडा-पाडी, जिरवा-जिरवी करत बसू नका, हे अजिबात खपवून घेतले जाणार नाही. सत्यजित तुम्ही खंबीरपणे मैदानात उतरून वाड्यावस्त्या पिंजून काढा. नव्या दमाची फळी निर्माण करा. असे सांगून ते पुढे म्हणाले
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वसामान्य जनतेसाठी शिवसेना काढली व वाढविली. शिवसेनेने अनेकांना मोठं केलं, ज्यांच्या नावावर ही लोकं मोठी झालीत त्यांच्या मुलालाच शिवसेनेतून त्यांनी बाहेर काढले. पक्षाचं नाव, चिन्ह चोरले ही यांची विश्वासार्ह्यता आहे. शेतकऱ्यांना भाव मिळत नाही, खतांच्या किमती वाढवल्या, सिलेंडर, पेट्रोल, डीझेलच्या किमती कमी झाल्या का? महिला म्हणतात अर्ध तिकीट नको पण सिलेंडरची किंमत कमी करा. हे सरकार जाहिरातींवर कोट्यवधी रुपये खर्च करतंय. त्यापेक्षा गोरगरीबांवर ते खर्च करा. कोण ताम्रपट घेऊन आला नाही. आज सत्ता आहे तर उद्या नाही. लोकांची कामे झाली पाहिजेत. मी आणि बाळासाहेब जिल्ह्याचे पालकमंत्री होतो. आम्ही विविध प्रकल्पांना गती देण्याचे आणि विकासासाठी झुकते माप देण्याचे काम केले.आताचे पालकमंत्री काय करताहेत पाटण-चिपळूण रस्त्याची काय अवस्था आहे याकडे कोण लक्ष देणार? कुठल्याच कामात क्वॉलिटी राहिली नाही. मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे. सत्तेची नशा, मस्ती, धुंदी चांगली नाही. जनतेने आपणास निवडून दिले जनतेची कामे करण्यासाठी, आपण काय उपकार करत नाही. काय भिती वाटते काय माहित. पुढे मागे जास्त गाड्यांचा ताफा लावायचा याचा विचार करा हा खर्च सरकारी असतो. जनतेच्या पैशाची उधळपट्टी करायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? असा सवाल त्यांनी ना. शंभूराज देसाईंना केला. आम्ही पण सत्तेत होतो. पण असं कधी केलं नाही. सत्तेचा गर्व टिकत नाही. शरद पवार साहेबांनी नरेंद्र पाटील यांना आमदार केले. रमेश पाटील यांना जिल्हा परिषद सदस्य केले तेही सोडून गेले. तुमचे वडील स्व. यशवंतराव चव्हाण साहेबाना मानणारे. मग असा काय चमत्कार झाला. असा टोला लगावून सत्यजित पाटणकर आपण पायाला भिंगरी लावा, खंबीरपणे काम करा, आपण कुठे कमी पडत आहोत याचा अंतर्मुख होवून विचार करा. नव्या दमाच्या कार्यकर्त्यांची फळी निर्माण करा असे सांगितले.
कोयनेचे प्रश्न अजूनही सुटले नाहीत. मी मंत्रीपदी होतो त्यावेळेस तारळे, निवकणे, साखरी, मराठवाडी, मोरणा-गुरेघर धरणे बांधताना अनेक अडचणी आल्या. या धरणांनी पाटण तालुक्यावर निसर्गाची उधळण केली त्याचा जनतेला वापर झाला पाहिजे. कोयना धरण बांधताना जमीन जुमला दिला त्यांना वाऱ्यावर आपण सोडणार नाही. सर्वात जास्त धरणे पाटण तालुक्यात आहेत त्याचा लाभ लोकांना होत आहे. वन्यप्राण्यांमुळे शेतीचे प्रचंड नुकसान होते ती मदत शेतकऱ्यांना झाली पाहिजे. आम्ही यावर आवाज नक्कीच उठवू, असे सांगून कोयना, पाटण, सातारा जिल्ह्यातील प्रश्न सोडवण्यासाठी नेहमी कटीबध्द असल्याचे शेवटी त्यांनी सांगितले.
सत्यजितसिंह पाटणकर म्हणाले, विक्रमसिंह पाटणकर दादांनी सुसंस्कृत राजकारण केले आणि विरोधक पाटणकरांच्या वाड्याच्या बाहेर विजयी मिरवणुकीत शड्डू ठोकून द्वेषाच निर्लज्ज राजकारण केल आहे. ज्या वाड्याने तुमचे कुटुंब राजकारणात आणलं त्याच वाड्यासमोर दंड थोपटण्याचे पाप तुम्ही केले आहे. दादांनी 35 वर्षे एकनिष्ठ राजकारण केले. तर दुसरीकडे गद्दारी व पन्नास खोके याशिवाय दुसरा विषयच नाही. स्वत:चा नेता आजारी असताना त्याचा गैरफायदा घेत नेत्याच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम विरोधकांनी केले. कारखान्यावर शॉक लागून युवक मयत झाला तरी निर्लज्जपणे तमाशाचा फड भरविण्यात आला. सत्तेची व पैशाची मस्ती या कार्यक्रमातून दिसून आली. आमचं राजकारण संघर्षातून पुढे आले आहे. विरोधकांना सत्तेची मस्ती आणि पैशाची गुर्मी आहे. विकास कामे करताना टक्केवारी मोठ्या प्रमाणात असून मोठा भ्रष्टाचार आहे. यावर्षी केलेला रस्ता पुढच्या वर्षी पाहायला मिळत नाही. काळ वेळ बदलत असते. हा भ्रष्टाचार आम्ही उघड करणार आहोत. आपण जिल्हा परिषदेला एक आणि विधानसभेला एक असं करु नका. आपणास पक्ष महत्त्वाचा आहे. आपल्यातील मतभेद बाजूला ठेवा वेळेनुसार दोन पावले पुढे मागे येवून सर्वांनी मिळून पक्ष मजबूत करूयात.
खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले, शरद पवार साहेबांचे मार्गदर्शन आणि अजित दादांची दिशा आपणास महत्त्वाची मानून कार्यकर्त्यांनी काम करावे.आपल मन, मस्तक, मनगट पक्षासाठी काम करीत राहिले पाहिजे. दहा महिने राहिले आहेत कामाला लागा आणि सत्यजित दादांना आमदार करा.
आ. बाळासाहेब पाटील म्हणाले, विक्रमसिंह पाटणकर यांनी राष्ट्रवादी स्थापनेपासून शरद पवार साहेबांची साथ सोडली नाही ते कायम एकनिष्ठ राहिले. अनेक वर्षे संघर्ष करून विक्रमसिंह पाटणकर यांनी भागोलिकदृष्ट्या दुर्गम असलेल्या विभागाला न्याय देण्याचे काम केले. मतदारसंघाचा कायापालट केला त्यांचेच धोरण पुढे नेण्याचे काम सत्यजित दादा करीत आहेत यांच्या पाठीशी आपण ठाम उभे राहूयात.
यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ शेलार, राजे संघर्ष प्रतिष्ठानचे योगेश पाटणकर यांनीही मनोगते व्यक्त केली. माजी उपसभापती रमेश मोरे यांनी प्रास्ताविक करून आभार मानले. कार्यक्रमास ढेबेवाडी, तळमावले विभागातून अनेक गावचे सरपंच, चेअरमन, संस्थाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
अजितदादांच्या हस्ते राजे संघर्ष प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी योगेश पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यांचा सत्कार घेवून राष्ट्रवादीमध्ये त्यांचे स्वागत करण्यात आले.