औंध(वार्ताहर):- औंध येथे सातारा ते कान्हरवाडी ही एसटी गाडी वेळेत न आल्याने शाळकरी मुली व मुलांनी भरपावसात रात्री सुमारे तीन औंध बसस्थानकात ठिय्या आंदोलन करून घोषणांनी परिसर दणाणून सोडला. टेंम्पो नको, सहानुभूती नको, आम्हाला वेळेत एसटी गाडी मिळालीच पाहिजे, आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणा देऊन एसटी प्रशासनासह ,शासकीय प्रशासन यंत्रणा हलवून सोडली. विद्यार्थ्यांचे रौद्ररूप पाहून औंध बसस्थानकात शेकडो, ग्रामस्थ ,युवकांनी गर्दी केली होती.
यावेळी कोरेगाव आगार व एसटी महामंडळाच्या मनमानी कारभाराबद्दल औंध ग्रामस्थ ,विद्यार्थी ,पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला.
याबाबत अधिक माहिती अशी, औंध येथे माध्यमिक ,काँलेजचे शिक्षण घेण्यासाठी कळंबी, वडी, त्रिमली, नांदोशी तसेच पुसेसावळी भागातून शेकडो विद्यार्थी औंध येथे येतात. सोमवारी ही शाळा सुटल्यानंतर कळंबी ,वडी,त्रिमली, नांदोशीचे विद्यार्थी सायंकाळी 4.30पासून सातारा -कान्हरवाडी एसटी गाडीची वाट पहात औंध बसस्थानकात बसले होते. मात्र सहा वाजले तरी एसटी गाडी न आल्याने या मार्गावरील शाळकरी मुलांनी औंध बसस्थानक परिसरात गाड्या प्रवेश करणाऱ्या मार्गावर भर पावसात आंदोलन सुरू केले. यावेळी शालेय प्रशासनाने एसटी गाडी येत नाही म्हटल्यावर खाजगी टेंपो गाडीची व्यवस्था केली मात्र किती दिवस एसटीचा मनमानी कारभार सहन करायचा अशा संतप्त प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त करून आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय ,वेळेत एसटी गाडया सोडल्याशिवाय याठिकाणा वरुन हटणार नाही अशी भूमिका घेतल्याने रात्री 9वाजेपर्यंत विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले नाही.
यावेळी सातारा कान्हरवाडी ही उशीरा आलेली एसटी गाडी ही विद्यार्थ्यांनी रोखून धरली होती.
दरम्यान रात्री उशीरा सातारा विभाग नियंत्रक ,कोरेगाव आगार वडूज आगाराच्या अधिकारी वर्गाने ठोस आश्वासन दिल्यानंतर तसेच औंधचे उपसरपंच दिपक नलवडे, सहसचिव प्रा.संजय निकम, प्राचार्य एस.बी.घाडगे, उपप्राचार्य प्रा.प्रदिप गोडसे ,भरतबुवा यादव ,संतोष जाधव
ग्रामस्थ ,शिक्षकांनी मध्यस्थी केल्यानंतर विद्यार्थी एसटी मधून कळंबी गावी जाण्यास तयार झाले.
प्रतिक्रिया :-
एसटी महामंडळाच्या गलथान कारभाराचा फटका वेळोवेळी आम्हा विद्यार्थ्यांना बसत असून त्यामुळे भर पावसात ठिय्या आंदोलन करण्याची वेळ आली. यापुढे तरी होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी वेळेत एसटी गाडया सोडाव्यात अन्यथा यापेक्षा वेगळे आंदोलन छेडू .
वारंवार होणाऱ्या दिरंगाईमुळे पालक चिंतेत असतात तसेच मोठ्या प्रमाणात अभ्यासाचे नुकसान होते. नियमित 5.15वाजता एसटी गाडी सोडावी.
:-करुणा सगरे विद्यार्थिनी इयत्ता नववी
प्रतिक्रिया :-
औंध हे शिक्षणाचे माहेरघर आहे. मात्र एसटी गाडयांच्या अनियमितपणामुळे विद्यार्थ्यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे तरी सकाळी व संध्याकाळी नियमित एसटी गाडयांच्या फेऱ्या सोडाव्यात . :- संदिप काळे पालक कळंबी ता.खटाव
औंध शिक्षण मंडळाच्या विविध विद्या शाखांमध्ये सुमारे तीन हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यातील बरेचसे विद्यार्थी परगावहुन एसटी बसने येतात. विद्यार्थ्यांना होणारा त्रास लक्षात घेऊन एसटी महामंडळाने वाहतूक व्यवस्था सुरळीत करावी. याबाबत एसटी महामंडळाच्या सर्व विभागांशी पत्रव्यवहार केला आहे.
:- प्रा.संजय निकम सहसचिव औंध शिक्षण मंडळ, औंध