Thursday, April 24, 2025
Homeसातारा जिल्हाजावळीमुनावळे जलपर्यटन प्रकल्पासाठी ५३ कोटी २२ लाख निधी मंजूर :- आ....

मुनावळे जलपर्यटन प्रकल्पासाठी ५३ कोटी २२ लाख निधी मंजूर :- आ. शिवेंद्रसिंहराजे ; जावली होणार देशातील एकमेव मोठं जागतिक जलपर्यटन केंद्र

सातारा :- जावली तालुक्यात पर्यटनवाढीबरोबर व्यवसाय वृद्धी आणि रोजगारनिर्मिती वाढली पाहिजे या उद्देशाने आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मागणीनुसार मुनावळे येथे कोयना शिवसागर जलाशयात जागतिक दर्जाचे जलपर्यटन केंद्र सुरु करण्यात आले आहे. दरम्यान, या जलपर्यटन केंद्राकडे पर्यटक आकर्षित होण्यासाठी याठिकाणी पायाभूत सुविधा निर्माण करणे गरजेचे होते. यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या मागणीनुसार राज्य शासनाने पर्यटन विभागाकडून मुनावळे जलपर्यटन प्रकल्पासाठी तब्ब्ल ५३ कोटी २२ लाख रुपये निधी मंजूर केला आहे. लवकरच हे पर्यटन केंद्र विकसित केले जाणार असून देशातील एकमेव जागतिक दर्जाचे मोठे आणि अत्याधुनिक जलपर्यटन केंद्र म्हणून जावली तालुक्याचे नाव जगभर प्रसिद्ध होणार आहे.
जावली तालुक्यात पर्यटन वाढले तर व्यवसाय आणि रोजगार वाढणार आहे. हेच ओळखून आ. शिवेंद्रसिंहराजे जावली तालुक्यात पर्यटनवाढीसाठी विविध उपक्रम आणि योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या कल्पक आणि अभ्यासू पाठपुराव्यातून मुनावळे येथे जागतिक दर्जाचा जलपर्यटन प्रकल्प सुरु करण्यात आला. दरम्यान, या प्रकल्पाच्या ठिकाणी पर्यटकांना पायाभूत सुविधा निर्माण झाल्या तरच येथे पर्यटक येणार आहेत आणि या पायाभूत सुविधा उभारणीसाठी भरीव निधी उपलब्ध व्हावा यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजेंचा राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरु होता. आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले असून सरकारने पर्यटन विभागाकडून मुनावळे जलपर्यटन प्रकल्पासाठी ५३ कोटी २२ लाख रुपये निधी मंजूर केला आहे. याबद्दल आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना. अजित पवार यांचे आभार मानले आहेत.
विलोभनीय निसर्गसौंदर्य, नितळ आणि स्वच्छ पाणी असलेला भारतातील सर्वोत्तम जलाशय म्हणून शिवसागर जलाशयाची ओळख आहे. या जलाशयावर मुनावळे येथे जागतिक दर्जाचे जलपर्यटन केंद्र सुरु करण्यात आले आहे. याठिकाणी पर्यटकांच्या सोयीसाठी सुमारे २० एकर जागेवर एकही झाड न तोडता, येथे असणाऱ्या झाडांचा या प्रकल्पात समावेश करून विविध सोयी सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. याठिकाणी पर्यटकांसाठी भव्य वास्तू उभारली जाणार असून त्यामध्ये पर्यटकांच्या बसण्याची व्यवस्था, उपहारगृह, पोहण्यासाठी मोठा स्वतंत्र स्विमिंग पूल, जागतिक दर्जाच्या स्कुबा डायव्हिंगसाठी कृत्रिम तलाव, रिसॉर्ट तसेच मोठमोठ्या कॉन्फरन्ससाठी भव्य सभागृह आदींची उभारणी मंजूर निधीतून केली जाणार आहे. याशिवाय या प्रकल्पामध्ये ३ हाऊस बोट, अमेरिका, यूरोपच्या धर्तीवर १ भव्य क्रूझ बोट यांचा समावेश असणार आहे. हा प्रकल्प येत्या काही दिवसात पूर्ण होणार असून याठिकाणी देश आणि परदेशातून वर्षाला सुमारे १० हजार पर्यटक भेट देतील असा या प्रकल्पाच्या अभ्यासकांचा अंदाज आहे. त्यामुळे देशातील एकमेव वेगळं आणि नावीन्यपूर्ण जागतिक दर्जाचे जलपर्यटन केंद्र म्हणून या प्रकल्पाकडे पाहिले जाणार आहे.
दरम्यान, या प्रकल्पामुळे पर्यटन वाढणार असून व्यवसाय व रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात निर्माण होणार आहेत. तसेच या प्रकल्पामध्ये स्थानिकांना प्राधान्य दिले असून त्यांनाच या प्रकल्पावर रोजगार दिला जाणार आहे. त्यासाठीचे आवश्यक प्रशिक्षणही स्थानिकांना दिले जात आहे. हे जल पर्यटन केंद्र म्हणजे आपण एखाद्या वेगळ्याच देशात आलो आहोत, असा नावीन्यपूर्ण अनुभव पर्यटकांना येणार आहे. हा महत्वाकांक्षी आणि जिव्हाळ्याचा प्रकल्प उभा राहिला आणि याठिकाणी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी भरीव निधी उपलब्ध करता आला याचे मला समाधान आहे. लवकरात लवकर हा प्रकल्प सुरु होईल आणि पर्यटन वाढ होऊन जावली तालुक्यातील अर्थकारणाला मोठी गती मिळेल, असा विश्वास आ. शिवेंद्रसिंहराजेंनी यानिमित्ताने व्यक्त केला आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular