सातारा दि २३(जिमाका) :- कराड शहरास वारुंजी जॅकवेलमधून पाणीपुरवठा करणाऱ्या नळ पाणीपुरवठा योजनेतील 600 मिलिमीटर व्यासाची अशुद्ध पाणी दाबनलिका कोयना नदीपात्रामध्ये नादुरुस्त झाल्याने शहराचा पाणीपुरवठा दिनांक 14 जुलै पासून खंडित झाला होता. कराड शहरास तातडीने पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी तात्पुरती पर्यायी व्यवस्था करण्यासाठी
राज्य उत्पादन शुल्क तथा पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी कराड येथे भेट देऊन तो सुरळीत करण्यासाठी जिल्हा नियोजन समिती मधून जेवढा निधी लागेल तेवढा निधी देण्याबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 मधील कोयना नदी पुलाच्या फुटपाथ वरून तात्पुरती व्यवस्था म्हणून पाईपलाईन टाकण्यासाठी रुपये 71 लक्ष च्या कामास दिनांक 23 जुलै 2024 रोजी जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून तातडीने प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे कराड शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे.