ज्युनिअर गटातील भारतीय पहिली मुलगी म्हणून मिळवला मान
सातारा ः येथील रजताद्री हॉटेल्स प्रा.लि.चे प्रमुख व ज्येष्ठ क्रिडामार्गदर्शक रमेश शानभाग यांची नात व सुप्रसिध्द बास्केटबॉलपटू व आंतरराष्ट्रीय रेस विजेते संकेत शानभाग यांची कन्या कु.तनिका हिने आंतरराष्ट्रीय मोटोक्रॉस स्पर्धेत स्थान मिळवले आहे. मलेशिया येथे दि. 23 ते 25 मार्च दरम्यान संपन्न होणार्या आंतरराष्ट्रीय मोटोक्रॉस स्पर्धेसाठी संपूर्ण देशभरातून ज्युनिअर गटातून निवड झालेली कु.तनिका ही पहिली महिला खेळाडू आहे.
मागील वर्षी सप्टेंबर महिन्यापासून देशांतर्गत झालेल्या विविध चार स्पर्धामध्ये तनिकाने स्पृहणीय यश मिळवले असून दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम सहभाग घेत त्यातही तिने तिसरा क्रमांक मिळवला होता. याशिवाय जयपूर, पुणे व बेंगलोर येथे तिने स्पर्धेतून चुणूक दाखवल्यामुळे तिला मलेशियातील या स्पर्धेसाठी निवडीचे पत्र मिळाले. आपला धाकटा भाऊ ईक्षण हा सन 2015 पासून ज्युनिअर गटात मोटोक्रॉस स्पर्धेत सराव करत असल्याची प्रेरणा घेवून तनिकाने या खेळात रस घेवून जिद्द व आत्मविश्वासाच्या जोरावर हे यश संपादन केले. प्रोफेशनल मोटोक्रॉस, मोटार सायकल चालवत सध्या ती केटीएम एसएक्स 85 या गाडीवर दररोज तासभराहून अधिक काळ सराव करत आहे. यामध्ये ग्राउंड प्र्रॅक्टीस, स्पीड प्रॅक्टीस व जंप प्र्रॅक्टीसचा सराव शास्त्रीय पध्दतीने करत आहे. मलेशियातील स्पर्धेसाठी कावासाकी केएक्स 85 सीसीची सुमारे 6 लाख रूपयाची मोटारसायकल स्पर्धेसाठी वापरणार आहे. आपल्या घराजवळील परिसरात तनिकासाठी विशेष 5 एकर परिसरात ट्रॅक बनवण्यात आलाअसून या ट्रॅकवर तासभर सराव, दररोज बास्केटबॉल प्रॅक्टीस व 10 ते 15किमी सायकलींग करत तनिका परिश्रम घेत आहेत.
संकेत शानभाग व रमेश शानभाग यांनी या पूर्वी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोटोक्रॉस स्पर्धा व गो काटिर्ंग स्पर्धामधून प्रथम, व्दितीय येण्याचा बहुमान मिळवला असून हेच बाळकडू सध्या तनिकाला मिळाले असून ती शानभाग परिवारातील तिसरी पिढी म्हणून या स्पर्धेत चमकत आहे.
मानसिक धैर्य उंचावण्यासाठी आपली आजी सौ. उषा शानभाग यांच्याकडून ध्यानधारणा तसेच योग प्रात्यक्षिके करत असून वडिल संकेत शानभाग व पुणे येथील प्रशिक्षक श्रीकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आई सौ. कविता शानभाग हिच्या प्रेरणेतून सरावासाठी झटक आहे. वयाच्या 21व्या वर्षी म्हणजे सन 2023 मध्ये जगातील डकार /पॅरिस रॅलीसाठी सहभाग घेत ही रॅली जिंकण्याचे ध्येय आहे. त्यापूर्वी एशियन, युरोपीयन मोटोक्रॉस स्पर्धांसाठीचा रोड मॅप नियोजित केला असून शालेय शिक्षणाबरोबरच या खेळाचे ध्येय मिळालेल्या कौटुंबिक पाठबळामुळे वाढत असल्याचे तनिकाने यावेळी सांगितले.
मलेशियातील या मोटोक्रॉस स्पर्धेसाठी तनिका आपले वडील संकेत व प्रशिक्षक श्रीकांत चव्हाण यांच्यासोबत 19 मार्च रोजी मलेशियाला रवाना होणार आहेत. या स्पर्धेत जगातील 40 हून अधिक स्पर्धक सहभागी होणार असून ती या स्पर्धेत निश्चित यश मिळवेल यासाठी तिला सातारा जिल्ह्यातील विविध क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत.