बेंगळुरू : बनावट मुद्रांक घोटाळा प्रकरणातील प्रमुख आरोपी अब्दुल करीम तेलगी (56) याचा येथील व्हिक्टोरिया हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. अनेक अवयव निकामी झाल्याने तेलगीचा मृत्यू झाल्याचे हॉस्पिटल सूत्रांनी सांगितले. तेलगीला एड्स झाल्याची चर्चा होती.
तेलगीला कोट्यवधी रुपयांच्या बनावट मुद्रांक घोटाळा प्रकरणी 2007 मध्ये दोषी ठरविण्यात आले होते आणि 30 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. त्याला 202 कोटी रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला होता.
दोन दशकांपूर्वी उघडकीस आलेल्या मुद्रांक घोटाळ्याने आणि तेलगीने आपल्या कबुलीजबाबात छगन भुजबळ यांच्यासह महाराष्ट्रातील अनेक बड्या नेत्यांची नावे घेतल्याने तेव्हा हा गैरव्यवहार माध्यमांत चांगलाच गाजला होता. या प्रकरणी सात जून 2003 रोजी पुण्यातील बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात भिवंडीतून 2200 कोटी, तर मुंबईतील कफ परेड भागातून 800 कोटी रुपयांचे बनावट मुद्रांक जप्त करण्यात आले होते.
बनावट मुद्रांक घोटाळ्याची व्याप्ती एवढी होती, की त्यानंतर तेलगीवर देशभरात 39 ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. तेलगीच्या मृत्यूमुळे या घोटाळ्यातील एक महत्त्वाचा अध्याय समाप्त झाला आहे.