कोरेगाव : केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकारला जनता अक्षरश: वैतागली आहे. तीन वर्षे या सरकारने जनतेला गंडावले असून, जनताच आता सरकारला त्यांची जागा दाखवून देईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळातील मुख्य प्रतोद आ. शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला.
फसव्या सरकारचा सार्वत्रिक निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे दि. 1 डिसेंबर ते 12 डिसेंबर अखेर यवतमाळ ते नागपूर अशी 153 कि. मी. ची हल्लाबोल पदयात्रा काढण्यात आली. त्याचे नेतृत्व आ. शिंदे यांनी केले. विदर्भात या पदयात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. युवक कार्यकर्ते मोठ्यासंख्येने या पदयात्रेत सहभागी झाले आहेत. सरकारच्या विरोधात विदर्भात मोठी लाट असून, जनता सरकारला वैतागली असल्याचे आ. शिंदे यांनी दूरध्वनीवरुन स्थानिक पत्रकारांना सांगितले.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खा. सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, धनंजय मुंडे यांच्यासह आजी-माजी मंत्री, खासदार, आमदार व पदाधिकार्यांच्या उपस्थितीत यवतमाळमध्ये हल्लाबोल पदयात्रेस सुरुवात झाली. पहिल्या दिवसापासून पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आत्महत्याग्रस्त शेतकर्यांचे कुटुंबीय व नातेवाईक देखील सरकारच्या नावाने खडे फोडत असून, त्यांना न्याय मिळाला नसल्याचे आर्वजून सांगत आहेत. विदर्भाच्या विकासाच्या केवळ गप्पा मारल्या जात असून, प्रत्यक्षात तेथे काडीचा विकास होताना दिसत नाही. विदर्भातील शेतकरी प्रत्यक्षात खूप अडचणीत आला असून, सरकारला त्यांच्याकडे लक्ष देण्यास वेळ नाही. कर्जमाफी विषयी शेतकर्यांना प्रचंड राग असल्याचे दिसून येत असल्याचे आ. शिंदे यांनी सांगितले.
लाभार्थी नव्हे आम्ही तर हक्कदार; युवकांमध्ये संतप्त भावना
विदर्भातील युवा शेतकरी सरकारवर तोंडसुख घेत आहेत. भाजप सरकारला कर्जमाफी द्यायची नाही, केवळ विरोधी पक्ष करत असलेल्या आंदोलनांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पाहून सरकारने कर्जमाफीचे गाजर दाखविले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव या योजनेला दिले असले तरी त्यांच्या नावाला कमीपणा आणण्याचे काम सरकारने केले आहे. सरकार रोज टी. व्ही. वर मी लाभार्थी अशी जाहिरात करत आहे, प्रत्यक्षात आम्ही लाभार्थी नव्हे तर हक्कदार आहोत. आम्हाला सोईसुविधा देण्याचे काम सरकारचे आहे, सरकार काही उपकार करत नाही, अशा संतप्त भावना युवकांमध्ये आहेत. पहिल्या दिवसापासून युवक या पदयात्रेत सहभागी झाले असून, ते नागपूरपर्यंत चालणार असल्याचे आ. शिंदे यांनी सांगितले.
बोंड आळीबाबत ठोस कृती नाही
विदर्भातील मुख्य पीक असलेल्या कापसावरील बोंडआळीचा प्रार्दुभाव वाढला असून, त्यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत आले आहेत. कापसावरील बोंडआळीचा बंदोबस्त करण्यात सरकार कमी पडले आहे. सगळ्याच मार्गाने शेतकरी अडचणीत आले असून, युवकांमध्ये देखील बेरोजगारी वाढली आहे. विदर्भातून सरकार विरोधी वातावरण तयार होत चालले असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामान्य शेतकर्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलनाची तीव्रता वाढविणार असल्याचे आ. शिंदे यांनी सांगितले.