सातारा : भारतीय समाजवादी रिपब्लिकन पक्षाच्यावतीने 22 तारखेपासून सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शासन धोरणांच्या विरोधात चक्री उपोषण सुरु केले होते. त्याला जिल्ह्यातून बहुतांश संघटनांनी सक्रीय पाठींबा दिला होता.
शुक्रवारी ता. 29 रोजी मनुस्मृती जाळून चक्री उपोषणाची सांगता करताना जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना पद्मश्री लक्ष्मण माने, भारीपचे चंद्रकांत खंडाईत, भीमशक्तीचे बाळासाहेब शिरसाट, रिपाइंचे दादासाहेब ओव्हाळ आणि कार्यकर्त्यांनी निवेदन दिले.
यावेळी दगडू सस्ते, नेताजी गुरव, अमर गायकवाड आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे कि, शासनाने 2005 पासून सरळ सेवा भरती बंद करताना शासकीय नोकरदारांना पेंशन बंद केली आहे. 2005 पूर्वी भरती झालेले आणि आता नव्याने हा भेदभाव का? शिक्षणाच्या क्षेत्रात बहुजनांचे खच्चीकरण सुरु आहे.
याचाच भाग म्हणून पटसंख्येभावी प्राथमिक 1300 शाळा बंद करण्याचा घाट घातला गेला आहे. जर शिक्षण मिळाले नाही तर चोर्या-दरोडे घालणारी जमात वाढवायची आहे का? संविधानाने दिलेल्या अधिकारांवर घाव घालण्याचा प्रकार राजरोस सुरु आहे. बेरोजगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासनाचे उदासीन धोरण असून भविष्यात याचा उद्रेक पहायला मिळणार असल्याचा इशारा ही देण्यात आला.
तत्पूर्वी आंदोलनाची सांगता करताना पद्मश्री लक्ष्मण माने यांच्या उपस्थितीत मनुस्मृती जाळण्यात आली. केंद्र-राज्याच्या धोरणांचा निषेध करताना मनुवादी शासन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.
यावेळी मच्छिंद्र जाधव, जयवंत कांबळे आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

