सातारा : सातारा शहरासह तालुक्यातील पर्यटनस्थळ आणि हॉटेल्सवरती पोलिसांचा वॉच राहणार असून निर्मनुष्य ठिकाणांसह घाट परिसरात पेट्रोलिंग वाहने गस्तीला राहणार आहेत. हुल्लडबाजांवर विशेष कारवाई करण्यात येणार असून ब्रेथ अनायलसीस मशीनच्या माध्यमातून मद्यपींवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
थर्टी फर्स्ट साजरा करताना कोणतीही अनुचित घटना घडू नये, याकरिता विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले असून यवतेश्वर-कास, सातारा-ठोसेघर, सातारा-मेढा, सातारा-कोरेगाव रस्त्यासह म्हसवे, अजिंक्यतारा, चारभिंती परिसरात पोलिसांच्या चेकपोस्ट असणार आहेत. महामार्गावरील धाबे-हॉटेल्सची तपासणी करण्यात येणार असून मद्यपींवर ठोस कारवाई करण्यात येणार आहे. शहर आणि परिसरातील निर्मनुष्य 34 ठिकाणांवर विशेष लक्ष असून शहरातील सर्व एंट्री ठिकाणांवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कण्हेर, उरमोडी धरणाच्या ठिकाणी कोणालाही प्रवेश नसल्याने या परिसरात पार्टीसाठी येणार्यांवर कारवाईचे संकेत पोलिसांनी दिले आहेत. शहरात येणार्या आणि बाहेर जाणार्या वाहनांची तपासणी केली जाणार असून या सर्व ठिकाणांवर ब्रेथ अनायलसीस मशिनच्या सहाय्याने मद्यपींवर कारवाई करण्यात येणार आहे. एकंदरीत नव्या वर्षाचे स्वागत करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता खाकी सज्ज असल्याचे स्पष्ट झाले आहे.
चौकट- नवीन वर्षाचे स्वागत करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस दल सज्ज असले तरी संशयास्पद काही वाटल्यास अथवा कुठे हुल्लडबाजी सुरु असल्यास 100 क्रमांकावर फोन करून माहिती द्यावी, असे आवाहन एसपी. संदीप पाटील यांनी सातारकरांना नववर्षाच्या शुभेच्छा केले आहे.
धरण परिसर, घाटमाथा, शहरातील एंट्री ठिकाणे, पर्यटनस्थळ आणि निर्मनुष्य ठिकाणांवर करडी नजर असून हुल्लडबाज आणि मद्यपींवर कडक कारवाई करण्यात येईल. – खंडेराव धरणे, एसडीपीओ, सातारा.

