Friday, April 25, 2025
Homeठळक घडामोडीकाळूबाईच्या नावानं चांगभलंच्या जयघोषानी दुमदुमला मांढरगड

काळूबाईच्या नावानं चांगभलंच्या जयघोषानी दुमदुमला मांढरगड

सातारा : आज मुख्य यात्रेच्या दिवशी काळूबाईच्या नावानं चांगभलंफ च्या जयघोषाने मांढरगड दुमदूमून गेला. कालपासून लाखो भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. शाकंभरी पोर्णिमेला मंगळवारी देवस्थान ट्रस्टचे मुख्य प्रशासक तथा जिल्हा न्यायाधीश राजेश लढ्ढा व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. सुनिता लढ्ढा यांच्या शुभहस्ते काळेश्‍वरी देवीची विधिवत महापुजा करण्यात आली. यावेळी ट्रस्टचे चेअरमन अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश नामदेव चव्हाण व पत्नी सौ. लक्ष्मीदेवी चव्हाण, प्रांताधिकारी सौ. अस्मिता मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके, तहसिलदार तथा प्रशासकिय विश्‍वस्त अतुल म्हेत्रे, पोलीस निरीक्षक विनायक वेताळ व विश्‍वस्त अ‍ॅड. मिलिंद ओक, अ‍ॅड. महेश कुलकर्णी, अतुल दोशी, जीवन मांढरे, चंद्रकांत मांढरे, सुधाकर क्षीरसागर, शैलेश क्षीरसागर, राजगुरू कोचळे, सचिव आर. एन. खामकर उपस्थित होते.
रांगेतील पहिले दांम्पत्य बाजीराव मारुती चौधरी व सौ. सुभद्रा चौधरी (रा. किवळे, ता. खेड, जि. पुणे) यांचा न्या. लढ्ढा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. हे दाम्पत्य गेली दहा वर्षे दर्शनासाठी येत असून आज पहाटे चार वाजता त्यांनी नंबर लावला होता. त्यानंतर दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. यावर्षी पुजारी सोमनाथ क्षिरसागर यांनी देवीची पूजा बांधली.
यावेळी गटविकास अधिकारी अशोक भवारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता क्रांतीकुमार मिरजकर, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता राजकुमार साठे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप यादव, वनक्षेत्रपाल महेश झांझुर्णे, अन्न औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त आर. सी. रुणवाल, अन्न सुरक्षा अधिकारी डी. एस. साळुंखे, आर. एम. खंडागळे, वीज वितरणचे उप कार्यकारी अभियंता अविनाश खुस्पे आदी उपस्थित होते.
देवीचे दर्शन घेण्यासाठी मुंबई, पुणे, बीड, अहमदनगर, ठाणे, रायगड, सोलापूर, नाशिक, सातारा या जिल्ह्यांबरोबरच कर्नाटक व आंधप्रदेशातील भाविक मोठ्या संख्येने वाई व भोर मार्गे वहानांव्दारे गडावर आले होते. ठिकठिकाणी राहूटया टाकून भाविकांनी मुक्काम केला होता. गावातील तळयापासून ते मंदिरापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा नारळ, पूजेचे साहित्य, फोटो, रंगीबेरंगी धागे, हॉटेल्स, मिठाईची व खेळण्यांची दुकाने थाटली गेली होती. एसटी महामंडळ मुंबई, पुणे व सातारा आगाराने स्वतंत्र तीन बसस्थानके कार्यरत केली होती. त्यांनी अधिक बसेसच्या फेर्‍या केल्याने गडावरील गर्दी लगेचच परतीच्या मार्गाने निघत होती.
अत्याधुनिक सी. सी. टी. व्ही. यंत्रणेच्या माध्यमातून देवस्थान ट्रस्टतर्फे टिव्हीव्दारे यात्रेवर लक्ष ठेवले जात होते. यात्रेत हरविलेल्या व्यक्तिंची नावे पुकारण्यात येत होती. यावेळी काही तरुणांनी देवीच्या विविध रुपातील प्रतिमा व वाघ, सिंह आदींच्या फोमच्या मुर्ती व सैराट चित्रपटातील कलाकारांचे फोटो फ्लेक्स गडावरील रस्त्यालगत लावून ट्रिक फोटोग्राफीची दुकाने थाटली होती.
 यात्रा सुरळीत व शांततेने पार पाडण्याकामी प्रशासन व देवस्थान ट्रस्टने चोख बंदोबस्त ठेवला असून सर्व भाविक शिस्तबध्द दर्शन घेताना दिसत होते. देवीचे दर्शन जवळून मिळत असल्याने सर्व भाविकांनी समाधान व्यक्त केले. भाविक देवीच्या चरणी अनेक भेटवस्तू व देणग्या देत होते. राज्य महामंडळाने ठिकठिकाणाहून एसटी बसेसची व्यवस्था केली होती. मंदिरापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर वाहनतळ असल्याने मंदिरापर्यंत पोहचेपर्यंत भाविकांची दमछाक उडत होती. दीपमाळ बंद करण्यात आली होती. परतीच्या मार्गावर ट्रस्टच्यावतीने बुंदीच्या लाडूचे प्रसादाचे वाटप करण्यात येत होते. भाविकांनी श्रीफळ वाढवू नये म्हणून दुकानदारांना सोललेले नारळ विकण्यास बंदी करण्यात आली होती याचे काटेकोर पालन व्हावे याकडे तहसिलदार म्हेत्रे स्वतः लक्ष देत होते. यावेळी जिल्हयातील विविध खात्यांचे अधिकारी व त्यांचे सहकारी मांढरदेव मंदिरास भेट देऊन आपापल्या खात्यांची कामे करण्यात मग्न होते.
मांढरगडावर अभुतपूर्व पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.  घाटामध्ये उपप्रादेशीक परिवहन अधिकार्‍यांचे पथक वाहनांची तपासणी करीत होते.
मंगळवारी व महिन्यातील शुक्रवार, शनिवार, अमावस्या, पोर्णिमेस मांढरदेवला दर्शनासाठी येणार्‍या भाविकांची प्रंचड गर्दी होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाला अजून आठवडाभर गडावर मुक्काम करावा लागणार आहे. ट्रस्टच्यावतीने काळेश्‍वरी देवीच्या फोटो विसर्जनासाठी महाव्दारालगत शेड बनविण्यात आले आहे.
Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular