सातारा : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या महान कार्यामुळे आज स्त्रियांना समाजात मानाचे स्थान आहे. सावित्रीबाईंमुळे महिलांसाठी शिक्षणाची कवाडे खुली झाली आणि आज सुशिक्षित महिला म्हणून आपण सर्वजण समाजात अभिमानाने वावरत आहोत. आज पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून महिला सर्व क्षेत्रात कार्यरत आहेत. केवळ शिक्षणच नव्हे तर, शिक्षणाबरोबरच महिलांना सक्षम करणे, हीच खरी सावित्रीबाईंना श्रध्दांजली ठरेल, असे प्रतिपादन राजमाता श्रीमंत छ. सुमित्राराजे भोसले बहुउद्देशीर स्वयं. महिला बचत गट फेडरेशनच्या अध्यक्षा श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी केले. दरम्यान, फेडरेशनमार्फत महिला बचतगटांच्या उत्पादीत मालासाठी दि. 10 ते 13 जानेवारी या कालावधीत पुष्कर मंगल कार्यालयात प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून त्याचा लाभ जिल्ह्यातील बचत गटांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
क्रांतीज्याती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमीत्त फेडरेशनच्यावतीने आयोजित कार्यक्रमात सौ. वेदांतिकाराजे बोलत होत्या. यावेळी नगरसेविका सौ. लिना गोरे, सौ. दिपलक्ष्मी नाईक, सौ. मनिषा काळोखे यांच्यासह सौ. सुजाता घोरपडे, अंजली कुलकर्णी, जुलेखा फरास आणि फेडरेशन आणि कर्तव्य सोेशल ग्रुपच्या सदस्या उपस्थित होत्या.
सौ. वेदांतिकाराजे म्हणाल्या, प्रत्येक महिलेच्या हाताला काम आणि केलेल्या कामाला दाम मिळाले तरच बचत गट चळवळीचा उद्देश सफल होणार आहे. सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षणाची दारे खुली करुन स्वत:च्या पायावर उभे राहण्याचा मार्ग दाखवला होता. आज प्रत्येक घरातील मुलगी, महिला सुशिक्षित आहे. परंतू कौटुंबीक अडचणीमुळे सर्वांनाच नोकरी करणे शक्य नसते. त्यामुळे शहरी आणि विशेषत: ग्रामीण भागातील महिलांनी आपल्या शिक्षणाचा फायदा स्वत:च्या सबलीकरणासाठी केला पाहिजे. त्यासाठी महिलांनी एकत्र येवून बचतगट स्थापन केले पाहिजेत. या गटांच्यामाध्यमातून विविध वस्तूनिर्मीती करुन त्याद्वारे आर्थिक सक्षमीकरण केले पाहिजे. अशा महिला बचत गटांसाठी राजमाता श्रीमंत छ. सुमित्राराजे भोसले बहुउद्देशीर स्वयं. महिला बचत गट फेडरेशनमार्फत हक्काची बाजारपेठ उपलब्ध करुन दिली जात आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सुजीत शेख यांनी सुत्रसंचालन केले. फेडरेशनच्या सचीव सौ. वर्षा आतार यांनी आभार मानले.