Saturday, January 24, 2026
Homeठळक घडामोडीसातार्‍यातील राजपथावर रंगली दोन वळूंची झुंज

सातार्‍यातील राजपथावर रंगली दोन वळूंची झुंज


सातारा ः सातारा शहरातील पोवई नाकापर्यत राजवाडयापासून असणार्‍या रस्त्याला राजपथ म्हटले जाते. राजपथ म्हणजे सातारकरांचा जणू जीवनमार्गच आहे. मात्र या राजपथाला खरोखरच आज सकाळी वेगळी झलक पहायला मिळाली. ती दोन तगडया वळूंच्या भांडणाची. सकाळची वेळ असल्याने अतिशय धावपळ आणि गडबडीत ये-जा करणार्‍या  शाळा, महाविद्यालय, बसस्थानक, शासकीय कार्यालयांतील कर्मचार्‍यांसाठी मोठी कसरत असते. त्यातच हा राजपथ एकेरी वाहतूकीसाठी सकाळी दहापासून खुला केल्यामुळे अनेकांना हा मार्ग टाळत पर्यायी मार्ग शोधावा लागतो. हा सगळा प्रकार पुढे असतानाच आज सकाळी ऐन वर्दळीच्या वेळी या मार्गावर दोन वळूंची झुंज लागली. अतिशय तगडया आणि महाकाय अशा या वळूंचा उग्र अवतार पाहून अनेकांची पळताभुई थोडी झाली. जागा सापडेल तिकडे ते सैरावैरा धावत असल्याने महिला, तरुणी, लहान मुलांची पळापळ झाली.यातच या परिसरातून आता बाहेर कसे पडायचे हीच भिती प्रत्येकापुढे होती.
टकरीचा हा प्रकार सुरू असताना काही युवकांनी पाण्याच्या बादल्यांचा फवारा या दोन वळूंवर टाकून ही झुंज सोडविण्याचा केविलवाणा प्रयत्नही केला. मात्र एकमेकांवर जाम चिडलेले हे दोन वळू रस्ताच काय संपूर्ण परिसर व्यापून एकमेकाला ढुशा देत होते. त्यातच एक वळू बाजूला जावून पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना दुसर्‍या चिडलेल्या वळूने राजपथाच्या बाजूला पार्किंग केलेल्या सुमारे 8 ते 10 दुचाकी जोराने पाडल्या. त्यामुळे अनेकांच्या दुचाकीचे मोठे नुकसान झाले. दुसर्‍या वळूला शोधत हा महाकाय वळू पुन्हा एकदा आपला मोर्चा त्याच्याकडे वळवत त्याच्याशी झुंज घेवू लागला. अनेक दुकानात असलेल्या ग्राहकांनाही मोठा पेच पडला. वाहतूक खोळंबली. अनेकांनी हातात लोखंडी कांबा आणि बांबूचे सोट घेवून मारत हाकलण्याचा प्रयत्न करुनही तो निष्फळ ठरला. आणि पुढे अखेर बर्‍याच काळानंतर हे दोन्ही वळू शांत झाले.आज जरी सातारकरांना या वळूंच्या झुंजीचे प्रदर्शन घडले असले तरी सातारा पालिका मात्र अशा मोकाट जनावरांबाबत आंधळी कोशिंबीरच खेळत आहे. शहरातील या प्रमुुख मार्गावर दिवसभर ठाण मांडलेल्या अनेक गाई व त्यांची वासरे वाहतूकीला अडथळा ठरत असतात. मात्र या मोकाट जनावरांना पकडून अनेकदा कोंडवाड्याचा रस्ता दाखवला तरी ही जनावरे वर्षातून हाताच्या बोटावर मोजण्याऐवढे दिवसच कोंडवाड्यात आणि बाकी सारे दिवस राजपथावरच दिसतात. अतिक्रमण मोहिमेचा फार्स सुरु असताना ही हालती बोलती अतिक्रमणे कधी कायमची हटवली जाणार हाच प्रश्‍न सामान्य सातारकरांना आहे.
आज झालेली ही झुंज जरी एक घटना असली तरी आता प्रयत्न या मोकाट जनावरांमुळे अनेक छोटे मोठे अपघात घडल्याची उदाहरणे सातारकरांना माहित आहेत. त्यामुळे स्वच्छ सातारा सुंदर सातारा ही संकल्पना राबवतानाच मोकाट जनावरांशिवायचा सातारा ही बनवणे हेच या नव्या वर्षाचे उद्दिष्ट पालिकेला ठरवावे लागेल.
संपादकांनी बजावली पत्रकाराची भूमिका
दैनिक ग्रामोध्दारचे संपादक बापूसाहेब जाधव हे सकाळी मोती चौकात निघाले असताना त्यांना हा झुंजीचा प्रकार पहायला मिळाला. क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी आपली गाडी थांबवून हे झुंजीचे क्षण आपल्या मोबााईल कॅमेर्‍यात साठवले आणि खर्‍या अर्थाने जागृत पत्रकाराची भूमिका पार पाडली.
वाहतूक पोलिसांची कुचंबणा
एकीकडे हा झुजीचा प्रकार सुरु असताना पोवई नाक्यावरुन राजवाड्याकडे जाणार्‍या गाड्यांना अडवत दुसर्‍या मार्गाने जाण्याची वाहतूक पोलिसांना करावी लागलेली कसरत पाहता अनेकांना ही अडवणूक का असाच प्रश्‍न पडत होता.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular